Ganesh Atharvashirsha Stotra | गणपती अथर्वशीर्ष स्तोत्र

Ganesh Atharvashirsha Stotra | गणपती अथर्वशीर्ष स्तोत्र

॥ अथ श्रीगणपत्यथर्वशीर्षप्रारंभः ।I

Ganesh Atharvashirsha Stotra

Ganesh Atharvashirsha path Benifits | अथर्वशीर्ष पाठाचे फायदे :

  •  मानवी जीवनात सर्वांगीण प्रगती होते.
  • सर्व प्रकारचे अडथळे दूर होतात.
  • व्यवसाय किंवा नोकरीत प्रगती होईल.
  • आर्थिक समस्या दूर झाल्यामुळे समृद्धी वाढते.
  • विद्यार्थ्यांना शैक्षणिक क्षेत्रात येणारे अडथळे दूर होतात.
  • विचारांतून नकारात्मकता नाहीशी होते आणि पवित्रता येते.

Ganesh Atharvashirsha Lyrics with meaning in marathi

॥ श्रीगणेशाय नमः ॥

शांती मंत्रा:

ॐ भद्रं कर्णेभिः शृणुयाम देवाः । भद्रं पश्येमाक्षभिर्यजत्राः ॥ स्थिरैरंगैस्तुष्टुवांसस्तनूभिः । व्यशेम देवहितं यदायुः ॥ १ ॥

ॐ स्वस्ति न इन्द्रो वृद्धश्रवाः । स्वस्ति नः पूषा विश्ववेदाः स्वस्तिनस्तार्क्ष्यो अरिष्टनेमिः । स्वस्ति नो बृहस्पतिर्दधातु ॥ २ ॥

ॐ शांति: ! शांति!! शांति !!!

॥अथ श्रीगणेशाथर्वशीर्ष व्याख्यास्यामः॥

अर्थ : अथर्वण ऋषींना गणेशाच्या स्वरुपाचं प्रत्यक्ष दर्शन झालेलं होतं. त्या अवस्थेत त्यांना स्फुरलेलं हे स्तोत्र जगाच्या कल्याणासाठी त्यांनी सांगितलं आहे. कोणत्याही ग्रंथाची सुरुवात करण्यापूर्वी मंगलचरण करण्याची जी पद्धत आहे. त्याला अनुसरुन पहिल्यादा मंगलार्थ ‘ओम्’ हा शब्द म्हटलेला आहे. त्यानंतरचा ‘ॐ शांती !!!’ पर्यंतचा शांतीपाठ आहे.

ॐ नमस्ते गणपतये । त्वमेव प्रत्यक्षं तत्त्वमसि ॥

त्वमेव केवलं कर्ताऽसि ॥ त्वमेव केवलं धर्ताऽसि ।।

त्वमेव केवलं हर्ताऽसि ॥ त्वमेव सर्वं खल्विदं ब्रह्मासि ॥

त्वं साक्षादात्माऽसि नित्यम् ॥१॥

अर्थ : अथर्वण ऋषी म्हणतात, सर्व गणांचा स्वामी जो गणपती त्याला माझा नमस्कार असो. हे गणपते ! प्रत्यक्ष दिसणारे जे ब्रह्मत्त्व आहे ते तूच आहेस. या सर्व सृष्टीला तू एकट्यानेच निर्माण केलं आहेस. या सर्व सृष्टीला धारण करणाराही तू एकटाच आहेस. सगळ्या सृष्टीचा संहार करणारा तूच एकटा आहेस. श्रुतींनी ‘सर्व खल्विदं ब्रह्म’ म्हणून ज्याला म्हटलं आहे ते सर्व चराचर व्यापणारं ब्रह्मही तूच आहेस. तू नाश न पावणारं असं आत्मस्वरूप तू आहेस.

ऋतं वच्मि ॥ सत्यं वच्मि ॥२॥

अर्थ : मी जे यथार्थ आहे आणि त्रिकालबाधित आहे तेच सत्य, तेच बोलत आहे.

अव त्वं माम् । अव वक्तारम् ॥ अव श्रोतारम् । अव दातारम् ॥

अव धातारम् । अवानूचानमव शिष्यम् ॥ अव पश्चात्तात् । अव पुरस्तात् ॥

अवोत्तरात्तात् । अव दक्षिणात्तात् ॥ अव चोर्ध्वात्तात् ॥

अवाधरात्तात् ॥ सर्वतो मां पाहि पाहि समन्तात् ॥ ३ ॥

अर्थ : तू माझं रक्षण कर. मी तुझ्या रूपाचं वर्णन करतोय, माझं रक्षण कर. तुझ्या गुणांचं श्रवण करतोय, माझं रक्षण कर. तुझ्या उपासनेचं लोकांना दान करतोय, माझं रक्षण कर. तुझ्या उपासनेची साधनं उत्पन्न करतोय, माझं रक्षण कर. गुरूजवळ सांगोपांग ज्ञान घेणाऱ्या माझे, शिष्याचे तू रक्षण कर. तुझी भक्ती उपासना करताना जी अनेक विघ्नं निर्माण होतात. त्यापासून तू माझं पश्चिमदिशेकडून रक्षण कर. तू पूर्वेकडून माझं रक्षण कर. उत्तरेकडून रक्षण कर.दशिणेकडून रक्षण कर. वरच्या आणि खालच्या दिशांकडून माझं रक्षण कर. सर्व अवांतर दिशांकडून आणि आसमंत भागाकडून तू माझं रक्षण कर.

त्वं वाङ्मयस्त्वं चिन्मयः ॥ त्वमानन्दमयस्त्वं ब्रह्ममयः ॥

त्वं सच्चिदानन्दाद्वितीयोऽसि ॥ त्वं प्रत्यक्षं ब्रह्मासि ॥ त्वं ज्ञानमयो विज्ञानमयोऽसि ॥ ४ ॥

तू वाणीस्वरूपी व नामरूपात्मक जीवस्वरूपी आहेस. तू आनंदमय व ब्रह्ममय आहेस. तूच सत्, चित्, आनंदरूपी असून ‘एकमेवाद्वितीय’ असा आहेस. तू प्रत्यक्ष (हृदयाधिष्ठित) ब्रह्मच आहेत. तू ज्ञानमय असून विज्ञानमयही आहेस.

सर्वं जगदिदं त्वत्तो जायते ॥ सर्वं जगदिदं त्वत्तस्तिष्ठति ॥

सर्वं जगदिदं त्वयि लयमेष्यति ॥ सर्वं जगदिदं त्वयि प्रत्येति ॥

त्वं भूमिरापोऽनलोऽनिलो नभः ॥ त्वं चत्वारि वाक्पदानि ॥ ५ ॥

अर्थ : हे सर्व जगत् तुझ्यापासून उत्पन्न होते, हे सर्व जगत् तुझ्यामुळेच टिकून राहते (म्हणजे स्थित होते) आणि हे सर्व जगत् तुझ्या ठिकाणीच लय पावते. तसेच हे सर्व जगत् तुझ्या ठिकाणीच परत येते. पृथ्वी, जल, अग्नि, वायू आणि आकाश ही पंचमहाभूते तूच आहेस. परा, पश्यंती, मध्यमा आणि वैखरी ही चार वाणीची स्थानेही तूच आहेस.

त्वं गुणत्रयातीतः । त्वमवस्थात्रयातीतः ॥ त्वं देहत्रयातीतः ॥

त्वं कालत्रयातीतः ॥ त्वं मूलाधारस्थितोऽसि नित्यम् ॥ त्वं शक्तित्रयात्मकः ॥

त्वां योगिनो ध्यायन्ति नित्यं ॥ त्वं ब्रह्मा त्वं विष्णुस्त्वं रुद्रस्त्वं इंद्रस्त्वं अग्निस्त्वं वायुस्त्वं सूर्यस्त्वं चन्द्रमास्त्वं ब्रह्मभूर्भुवः स्वरोम् ॥६॥

अर्थ : तू सत्त्व, रज आणि तम या त्रिगुणांपलीकडील आहेस. तू जागृति, स्वप्न व सुषुप्ति या तीन अवस्थांपलीकडील आहेस. तू स्थूल, सूक्ष्म व आनंदमय अशा तीन देहांपलीकडील आहेस. तू उत्पत्ति, स्थिति, लय किंवा वर्तमान, भूत व भविष्य या तीन कालांच्या पलीकडील आहेस. तू शरीरातील मूलाधार नावाच्या चक्राच्या ठिकाणी नित्य राहतोस. तू जगताची उत्पत्ति, स्थिति व लय करणाऱ्या ज्या त्रिविध शक्ती आहेत; तत्स्वरूपी आहेस. जीवन्मुक्त योगी निरंतर तुझे ध्यान करीत असतात. तू ब्रह्मदेव (सृष्टिकर्ता), तू विष्णु (सृष्टिपालक), तू शंकर (सृष्टिसंहारक), तू इंद्र (त्रिभुवनैश्वर्याचा उपभोग घेणारा), तू अग्नि (यज्ञामध्ये हविर्द्रव्य ग्रहण करणारा), तू वायू (सर्व जीवांना प्राण देणारा), तू सूर्य (सर्वांना प्रकाश देऊन कार्याची प्रेरणा करणारा), तू चंद्र (सर्व वनस्पतींना जीवन देणारा), तू ब्रह्म (सर्व प्राणिमात्रांतील जीवरूपी), पृथ्वी, अंतरिक्ष, स्वर्ग व ओंकार हे सर्व आहेस.

गणादिं पूर्वमुच्चार्य वर्णादिं तदनन्तरम् ॥ अनुस्वारः परतरः ॥

अर्धेन्दुलसितम् ॥तारेण ऋद्धम् ॥ एतत्तवमनुस्वरूपम् ॥

गकारः पूर्वरूपम् ॥ अकारो मध्यमरूपम् ॥ अनुस्वारश्चात्यरूपम्।।

बिन्दुरुत्तररूपम् ॥ नादः सन्धानम् ॥ संहिता सन्धिः ॥ सैषा गणेशविद्या ॥

गणक ऋषिः ॥ निचृद्गायत्रीच्छन्दः।। गणपतिर्देवता ॥ ॐ गं गणपतये नमः ॥७ ॥

अर्थ : (याप्रमाणे गणेशाचे सर्वात्मक स्वरूप वर्णन केल्यावर त्या स्वरूपाचा साक्षात्कार होण्यासाठी गणेश विद्या (मंत्र) सांगतात.)गुण या शब्दाचा पहिला वर्ण ग् कार हा प्रथम उच्चारावा; वर्ण म्हणजे अक्षरे, त्यातील पहिला वर्ण ‘अ’ कार हा ‘गू’ काराच्या पुढे उच्चारावा; त्याच्या पुढे अनुस्वार अर्धचंद्रांकित असा म्हणजे सानुनासिक उच्चारावा. तार म्हणजे प्रणव, त्याने तो एकाक्षर मंत्र युक्त करावा. म्हणजे प्रथम प्रणव उच्चारून पुढे एकाक्षर मंत्र उच्चारावा; हे तुझ्या मंत्राचे स्वरूप आहे.याप्रमाणे सांकेतिक रीतीने मंत्रस्वरूप प्रथम सांगितले, परंतु सामान्य बुद्धीच्या लोकांना ते कळणार नाही, म्हणून स्वत: च पुन: जास्त सोपे करून सांगतात ग् कार हे या मंत्राचे पूर्वरूप म्हणजे पहिला वर्ण आहे. मधला वर्ण अकार आहे. शेवटचा वर्ण अनुस्वार आहे. अनुस्वारापुढे बिंदु अनुनासिक चिन्ह आहे. या भिन्न भिन्न वर्णांचे संधान म्हणजे एकीकरण करणारा नादसारखा स्वर असावा. या नादप्रेरित वर्णाचा संधिसंमीलन संहितारूप एका प्रमाणाने उच्चारण – करणे असा असावा. अशा प्रकारे उच्चारलेला मंत्र ती ही गणेशविद्या आहे. म्हणजे गणेशाची प्राप्ति करून देणारा मंत्र आहे. या मंत्राचा गणक हा ऋषी आहे. निचृद्रगायत्री हा छंद आहे. गणपती ही मंत्राची देवता आहे. (इतके सांगून पुढे ते मंत्ररूप उच्चारून दाखविले आहे. ते असे) ‘ॐ गं’ हे ते मंत्रस्वरूप आहे. ते जपून झाल्यावर शेवटी ‘गणपतये नमः असे , म्हणून नमस्कार करावा. (या मंत्रस्वरूपामध्ये ग् कार हा ब्रह्मदेवरूपी, अकार हा विष्णुरूपी, अनुस्वार हा शिवरूपी, अनुनासिक हा सूर्यरूपी व ओंकार हा शक्तिरुपी असल्यामुळे हा मंत्र म्हणजे देवतापंचायतनच आहे असे मुद्गल पुराण खंड ५ मध्ये सांगितले आहे.)

एकदन्ताय विद्महे । वक्रतुण्डाय धीमहि ॥

तन्नो दंति प्रचोदयात् ॥ ८ ॥

अर्थ : (येथे ‘दंतिः प्रचोदयात्’ असे कित्येक म्हणतात. परंतु तो पाठ भाष्यानुसारी नाही. नारायणोपनिषदामध्ये तत्पुरुषाय विद्महे वक्रतुंडाय धीमहि । तन्नो दंतिः । प्रचोदयात् । असा मंत्र आहे. त्याचे ते अनुकरण असावे.)याप्रमाणे गणेशविद्या सांगून आता गणपतीची गायत्री सांगतात- आम्ही एकदंताला (तो सर्वार्थदाता आहे असे) जाणतो व त्या वक्रतुंडाचे ध्यान करतो. तो (ब्रह्मात्मक) दंती आम्हांला (आपल्या भक्तीची) प्रेरणा करो.

एकदन्तं चतुर्हस्तं पाशमंकुशधारिणम् ॥ रदं च वरदं हस्तैर् बिभ्राणं मूषकध्वजम् ॥

रक्तं लम्बोदरं शूर्पकर्णकं रक्तवाससम् । रक्तगन्धानुलिप्तांगं रक्तपुष्पै: सुपूजितम् ॥

भक्तानुकम्पिनं देवं जगत्कारणमच्युतम् ।आविर्भूतं च सृष्ट्यादौ प्रकृतैः पुरुषात्परम् ॥

एवं ध्यायति यो नित्यं स योगी योगिनां वरः ॥ ९ ॥

 (‘भक्तानुकंपितं’ हे भाष्यानुसारी नाही.)

अर्थ : याप्रमाणे प्रथम नाममंत्र, पुढे एकाक्षरमंत्र, नंतर गायत्रीमंत्र असे तीन प्रकारचे मंत्र सांगून झाल्यावर ध्यानाकरितां गणेशमूर्तीचे स्वरूप वर्णितात – ज्याला एकच (उजवा) दात आहे; ज्याला चार हात असून त्यामध्ये वरील उजव्या हातात पाश, वरील डाव्या हातात अंकुश, खालील डाव्या हातात हत्तीचा दात व उजव्या हाती वरदमुद्रा, याप्रमाणे धारण केलेली आहेत; उंदीर हा ज्याचे चिन्ह (वाहन) आहे; रक्त वर्णाचा; लंबोदर; सुपासारखे ज्याचे कान आहेत व ज्याने लाल वस्त्रे परिधान केली आहेत; रक्तचंदनाची उटी ज्याच्या अंगाला लावलेली आहे व तांबड्या फुलांनी ज्याची पूजा केलेली आहे असा, आपल्या भक्तांवर निरंतर कृपा करणारा, सर्व जगाला लीलेने उत्पन्न करणारा व अविनाशी, सृष्टीच्या पूर्वीच प्रकट झालेला आणि प्रकृती व पुरुष यांच्याही पलीकडे असणारा अशा प्रकारच्या गणपतीचे जो निरंतर ध्यान करतो, तो सर्व योग्यांमध्ये श्रेष्ठ योगी होय.

नमो व्रातपतये । नमो गणपतये ॥

नमः प्रमथपतये ॥नमस्तेऽस्तु लंबोदरायैकदन्ताय । विघ्ननाशिने शिवसुताय । श्रीवरदमूर्तये नमो नमः ॥ १० ॥

अर्थ :(येथे ‘नमः प्रथमपतये’ असा कित्येकांचा पाठ आहे व तोही संमत आहे. त्याचा अर्थ वर्णांमध्ये प्रथम ब्राह्मण आणि त्यातही प्रथम – मुख्य- योगी. त्या योगीजनांच्या स्वामीला नमस्कार असो.) याप्रमाणे ध्यानविधि सांगून पुढे ग्रंथसमाप्तीनिमित्त गणेशाचे नमन करतात. देवसमुदायांच्या स्वामीला माझा नमस्कार असो. गणांच्या पतीला नमस्कार असो. शंकराचे सेवक जे प्रथम गण त्यांच्या अधिपतीला आमचा नमस्कार असो. लंबोदराला नमस्कार असो. एकदंताला नमस्कार असो. विघ्नांचा नाश करणारा शिवपुत्र आणि वरदमूर्ती अशा गणपतीला पुनः पुन्हा नमस्कार असो.

याप्रमाणे मूळ गणेश अथर्वशीर्ष येथपर्यंत सांगून पुढे त्याची फलश्रुति सांगतात एतदथर्वशीर्षं योऽधीते ॥

स ब्रह्मभूयाय कल्पते । स सर्वविघ्नैर्न बाध्यते ॥स सर्वतः सुखमेधते ॥ स पञ्चमहापापात् प्रमुच्यते ॥

अर्थ : या अथर्वशीर्षाचे जो अध्ययन – पठण – करतो, तो ब्रह्मस्वरूपाला प्राप्त होतो. त्याला सर्वत्र सुखप्राप्ति होते. त्याला कोणत्याही विघ्नाची बाधा होत नाही. तो पंचमहापातकापासून (ब्रह्महत्या, सुरापान, गुरुस्त्रीगमन, सोन्याची चोरी आणि ही पाप करणाऱ्यांशी संसर्ग) मुक्त होतो.

सायमधीयानो दिवसकृतं पापं नाशयति ॥ प्रातरधीयानो रात्रिकृतं पापं नाशयति ॥

सायं प्रातः प्रयुञ्जानो अपापो भवति ॥ सर्वत्राधीयानोऽपविघ्नो भवति ॥

धर्मार्थकाममोक्षं च विंदति ॥

अर्थ :संध्याकाळी पठण करणारा दिवसा केलेल्या पातकांचा नाश करतो. सकाळी पठण करणारा रात्री केलेल्या पातकांचा नाश करतो. याप्रमाणे सायंकाळी आणि सकाळी पठण करणारा मनुष्य पूर्ण निष्पाप होतो. सर्वत्र पठण करणारा निर्विघ्न होतो आणि त्याला धर्म, अर्थ, काम, मोक्ष या चतुर्विध पुरुषार्थांचा लाभ होतो.

इदमथर्वशीर्षमशिष्याय न देयम् ॥ यो यदि मोहाद्दास्यति ॥

स पापीयान् भवति ॥ सहस्त्रवर्तनात् यं यं काममधीते तं तमनेन साधयेत् ॥ ११ ॥

अर्थ : हे अथर्वशीर्ष श्रद्धा व आदर नसलेल्या शिष्याला शिकवू नये. जर कोणी द्रव्यलोभादि मोहामुळे शिकवील तर, तो अत्यंत पापी होईल. या अथर्वशीर्षाची सहस्र (१०००) आवर्तने केली असता, ज्या ज्या इच्छा मनात धरल्या असतील त्या त्या सर्व पूर्ण होतात.

अनेन गणपतिमभिषिंचति ॥ स वाग्मी भवति ॥

चतुर्थ्यामनश्नन् जपति॥ स विद्यावान् भवति ॥ इत्यथर्वण- वाक्यम् ॥

ब्रह्माद्यावरणं विद्यात् ॥ न विभेति कदाचनेति ॥ १२ ॥

अर्थ :या अथर्वशीर्षाने जो गणपतीला अभिषेक करतो तो उत्तम वक्ता होतो, चतुर्थीच्या दिवशी काही न खाता, (उपवास) जो सर्व दिवस याचा जप करतो, तो विद्यासंपन्न होतो. असे अथर्वणऋषीचे वचन आहे.(म्हणून ते विश्वसनीय आहे.) ब्रह्मादिकांवर मायेचे आवरण आहे ते नीट जाणावे म्हणजे केव्हांही भय वाटत नाही, तो निर्भय होतो.

यो दूर्वांकुरैर्यजति ॥ स वैश्रवणौपमो भवति ॥ यो लाजैर्यजति । स यशोवान् भवति ।। स मेधावान् भवति ॥ यो मोदकसहस्रेण यजति ॥ स वाञ्छितफलमवाप्नोति ॥ यः साज्यसमिद्भिर्यजति ।।स सर्वं लभते । स सर्वं लभते ॥ १३ ॥ 

अर्थ :जो दूर्वांकुरांनी हवन करतो, तो कुबेरासारखा धनवान होतो. जो भाताच्या लाह्यांनी हवन करतो,तो सर्वत्र यशस्वी आणि बुद्धिमान होतो. जो सहस्त्र मोदकांचा अथर्वशीर्षमंत्रांचा होम करतो तो आपले इष्ट फल प्राप्त करून घेतो. घृतयुक्त समिधांनी जो हवन करतो तो सर्व मिळवितो, सर्व काही मिळवितो.

अष्टौ ब्राह्मणान् सम्यग् ग्राहयित्वा ॥ सूर्यवर्चस्वी भवति ॥

सूर्यग्रहे महानद्यां प्रतिमासंनिधौ वा जप्त्वा सिद्धमंत्रो भवति ॥

अर्थ : आठ ब्राह्मणांना हे अथर्वशीर्ष उत्तम रीतीने शिकविले असता, शिकविणारा सूर्याप्रमाणे तेजस्वी होतो. सूर्यग्रहणाच्या वेळी गंगा, यमुना, गोदा, कृष्णा इत्यादी महानद्यांच्या तीरावरील अथवा महाक्षेत्रांतील गणेशमूर्तीच्या जवळ जर याचा जप केला, तर तो जप करणारा सिद्धमंत्र होतो. (मंत्रांत सांगितलेल्या फलाची तत्काल प्राप्ति होण्याचे सामर्थ्य ज्याला प्राप्त झाले आहेत्याला सिद्धमंत्र म्हणतात.)

महाविघ्नात् प्रमुच्यते ॥ महादोषात् प्रमुच्यते ॥

महापापात् प्रमुच्यते ॥ स सर्वविद् भवति स सर्वविद् भवति ॥

य एवं वेद । इत्युपनिषत् ॥ १४ ॥

(येथे ‘महाप्रत्यवायात् प्रमुच्यते ‘ असा कित्येकांचा पाठ आहे.)

अर्थ : हा जपकर्ता महाविघ्नांपासून मुक्त होतो. महादोषांपासून मुक्त होतो. महापातकांपासून मुक्त होतो. (तसेच महासंकटांपासूनही मुक्त होतो.) हे जो यथार्थ जाणतो तो सर्वज्ञानी होतो, तो सर्वज्ञानी होतो. येथे ही अथर्वणोपनिषद् समाप्त झाली. (‘उपनिषद्’ हा संस्कृत शब्द स्त्रीलिंगी आहे.)

ॐ सह नाववतु । सह नौ भुनक्तु ।। सह वीर्यं करवावहै ॥

तेजस्विनावधीतमस्तु मा विद्विषावहै ।।

ॐ भद्रं कर्णेभिः शृणुयाम देवाः ।। भद्रं पश्येमाक्षभिर्यजत्राः ॥

स्थिरैरंगैस्तुष्टुवांसस्तनूभिः ॥ व्यशेम देवहितं यदायुः ॥ १ ॥

ॐ स्वस्ति न इन्द्रो वृद्धश्रवाः । स्वस्ति नः पूषा विश्ववेदाः ॥

स्वस्ति नस्तार्क्ष्यो अरिष्टनेमिः । स्वस्ति नो बृहस्पतिर्दधातु ॥ २ ॥

ॐ शान्तिः । शान्तिः । शान्तिः इति श्रीगणपत्यथर्वशीर्षं समाप्तम ॥

अर्थ :हे अध्ययन आम्हा दोघांचे (गुरुशिष्यांचे) बरोबर रक्षण करो, दोघांना बरोबरच उपयोगी पडो, दोघेही बरोबरच पराक्रमी होऊ या! आम्हां दोघांचे अध्ययन तेजस्वी असो. आम्ही कधीही द्वेष करणार नाही. सर्वत्र नेहमी शांति असावी. हे देवहो! आम्ही कानांनी मंगल ऐकावे, डोळ्यांनी उत्तम, शुभ पहावे आणि बलवान अवयवांनी तुमची स्तुती व सेवा करीत असतांनाच देवांनी दिलेले पूर्ण आयुष्य व्यतीत करावे अशी प्रार्थना आहे. महाकीर्तिमान असा इंद्र आमचे कल्याण करो. सर्वधनसंपन्न असा पूषा देव आमचे मंगल करो. तो अरिष्टनेमि असा पक्षिराज गरुड आमचे शुभ करो आणि वाणीचा अधिपति देवगुरु नेहमी आम्हाला श्रेयस् प्राप्त करून देवो, सर्वत्र नेहमी शांतता वृद्धिगंत होवो.(ही शांति या अथर्वशीर्षाचे पठनापूर्वी आणि शेवटी म्हणावी. सर्वत्र एकाच प्रकारचे शांतिमंत्र आढळत नाहीत व कित्येत तर शांति म्हणतही नाहीत, तथापि अथर्वशीर्ष हा उपनिषद् मंत्र असल्यामुळे शांतिपाठ म्हणण्याची आवश्यकता आहे; म्हणून सामान्य शांतिमंत्र येथे दिले आहेत.)

याप्रमाणे श्रीगणपत्यथर्वशीर्षाचा अर्थ येथे समाप्त झाला.

Ganpati Atharvashirsha PDF