manache shlok with meaning
Manache Shlok With Meaning । मनाचे श्लोक अर्थ सहित
Manache Shlok Lyrics
बहु चांगले नाम त्या राघवाचे ।
अती साजिरे स्वल्प सोपे फुकाचे ।
करी मूळ निर्मूळ घेता भवाचे ।
जिवा मानवा हेचि कैवल्य साचे ।।
शब्दांचे अर्थ : राघवाचे – रामप्रभूचे, साजिरे – सुंदर, स्वल्प सोपे. फुकाचे – बिनखर्चाचे. भव संसार, कैवल्य मोक्ष. साचे खरा.
अर्थ : रामरायाच्या नावातच एक जादू आहे. त्याचे नाव सुंदर, सोपे, मनाला शांतता देणारे व अगदी बिनखर्चाचे आहे. ते नेहमी घेणाऱ्याला समाधान तर वाटेलच, पण त्याचा संसार समाधानी दिसेल. तो आनंद हाच खरा मोक्ष, म्हणजेच स्वर्गसुख समजावे.
मुलांनी काय करावे?
रामरायाचे नामस्मरण करावे. मनात कधीही वाईट विचार आला तर तेव्हाही राम-राम असे काही वेळ म्हणावे. मनातले वाईट विचार नाहीसे होतील. चांगले विचार सुचतील.
जनी भोजनी नाम वाचे वदावे ।
अती आदरे गद्य घोषे म्हणावे ।
हरी चिंतनी अन्न सेवीत जावे ।
तरी श्रीहरी पाविजेतो स्वभावे ॥
शब्दांचे अर्थ: भोजनी हरिचिंतन – रामरायांची आठवण, जेवताना. घोष स्पष्ट आवाजात, स्वभावे – सहज.
अर्थ : रोज जेवायच्या वेळी राम-राम असे स्पष्ट आवाजात म्हणून जेवायला आरंभ करावा. रामाची आठवण करीतच जेवण संपवावे. अशा वेळी तो प्रभू तुम्हाला समाधान देईल. कृपा करील.
मुलांनी काय करावे?
रोज जेवणापूर्वी ‘वदनि केवळ घेता’ किंवा ‘जनी भोजनी’ हा श्लोक म्हणावा. मगच जेवायला सुरुवात करावी. जेवताना मन आनंदी ठेवावे, रागावू नये. चिडू नये. शांतपणा ठेवावा.
जगी पाहता राम हा अन्न दाता ।
तया लागलीहो तत्त्वता सारचिंता ।
तयाचे मुखी नाम घेता फुकाचे ।
मना सांग पारे तुझे काय वेचे ॥
शब्दांचे अर्थ : अन्नदाता – अन्न देणारा, तत्त्वता सारचिंता – सर्व काळजी, वेवे – बिघडेल. खरोखर.
अर्थ : जगात सर्वांचा अन्नदाता राम आहे. त्यालाच सर्वांची काळजी वाटते. तो आपल्या भक्तांवर माया करतो. त्या प्रभूचे नाव सर्वांनी घ्यावे. नाव घ्यायला काही खर्चही होत नाही. हा उपाय प्रत्येकाने करावा. त्यानं काहीच बिघडणार नाही.
मुलांनी काय करावे?
दररोज जेवणापूर्वी हात, पाय, तोंड धुवावे. पानावर बसताच राम-नाम आठवावे. एक छोटा ‘घास’ रामाचा प्रसाद म्हणून बाजूला ठेवावा. सावकाश जेवावे. पानात काही टाकू नये. सर्व जेवण पूर्ण झाल्यावर बाजूला ठेवलेला ‘रामप्रसाद’ खाऊन मगच पानावरून उठावे.
हरी नाम नेमस्त पाषाण तारी ।
बहु तारिले मानवी देहधारी ।
तया रामनामी सदा जो विकल्पी ।
बदेना कधी जीव तो पापरूपी ।।
शब्दांचे अर्थ : नेमस्त – सोपे, साधे, तारी – तरंगत ठेवले, तारिले – रक्षण केले, विकल्प – संशय.
अर्थ : लंकेत जाण्यासाठी समुद्रावर पूल तयार करताना, रामाचे नाव घेऊन एकेक ताशीव दगड पाण्यावर तरंगत ठेवून पूल तयार झाला. असा रामनामात चमत्कार आहे. रामरायाने आपल्या कृपेने अनेक संकटांतूनही सोडविले आहे, त्या श्रेष्ठ रामाबद्दल जो संशय घेईल किंवा त्याचे पवित्र नाव घेणार नाही तो मनुष्य निश्चित पापी समजावा.
मुलांनी काय करावे?
नेहमी घरच्या देवांवर श्रद्धा ठेवावी. तशीच प्रभू रामरायांवर! देवाबद्दल किंवा आईवडिलांबद्दल कधीच संशय आणू नये. सर्वांना पुण्य मानावे. सर्वांवर विश्वास ठेवावा. ‘जिये विश्वास, तिथे यश खास!’ हे विसरू नका.
जगी धन्य वाराणशी पुण्यराशी ।
तिथे मानि जाता गती पूर्वनाशी ।
मुखी रामनामावळी नित्य कळी ।
जिवा हित सांगे सदा चंद्रमौळी ।।
शब्दांचे अर्थ: वाराणशी काशी (हिंदूंचे पवित्र क्षेत्र), पूर्वज – पूर्वी जन्मलेला (आता मृत), मुखी – तोंडाने, सदा – सदोदित, चंद्रमौळी – श्री शंकर,
अर्थ : काशी क्षेत्र हे सर्व हिंदू लोक फार पवित्र मानतात. तेथील गंगानदीत स्नान केल्याने आपल्या पूर्वजांना सद्गती मिळते, अशी भावना आहे. त्याचप्रमाणे सतत रामाचे नाव घरी घेत गेल्यासही सर्व कुटुंबाचे हित होत असते, असे भगवान शंकर सांगतात.
मुलांनी काय करावे?
मोठेपणी ज्यांना जमेल त्यांनी काशीयात्रा करावी. गंगास्नान करावे. इतर धार्मिक विधी करावेत. पण घरी नेहमी रामनाम घेण्याचा क्रम कधीच चुकवू नये. श्री शंकराची तशी सर्वांना आज्ञा आहे, हे विसरू नका!
अती लीनता सर्वभावे स्वभावे ।
जना सज्जना लागि संतोषवावे ।
देहे करणी सर्व लावीत जावे ।
सगुणी अती आदरेसी बदावे ।।
शब्दांचे अर्थ: लीनता नम्रपणा सज्जन चांगले लोक, संतोषवावे – सुखवावे, सगुण गुणवान (गुणी), आदर- मान, मोठेपणा.
अर्थ : प्रत्येकाने आपल्या स्वभावात नम्रपणा ठेवावा. सर्व सज्जन लोकांशी बोलताना आपले बोलणे मर्यादशीर असावे, उद्धटपणा नसावा. स्वतः सर्वांच्या हितासाठी झटत असावे. जे गुणी लोक आहेत त्यांचा आदर राखूनच बोलावे.
मुलांनी काय करावे?
नेहमी नम्रपणा ठेवावा. चांगल्या व गुणवान लोकांशी नव्हे तर बोलताना मयदिने बोलावे. उद्धटपणा नसावा. आपण सर्वांच्या हितासाठी झटावे.
सदा सर्वदा देव सन्नीध आहे ।
कृपाळूपणे अल्प धारिष्ट पाढे ।
सुखानंद आनंद कैवल्य दानी ।
नुपेक्षी कदा राम दासाभिमानी ।।
शब्दांचे अर्थ: सन्नीष – जवळ, धारिष्ट – धीर करून, सुखानंद – सुखाचा आनंद, कैवल्य – मोक्ष, नुपेक्षी – सोडू नको, विसरू नको.
अर्थ : देव फक्त देवळातच नसतो. दूरही नसतो. तो प्रत्येकाच्या अंतःकरणात आहे. जो श्रद्धेने पाहील, त्याला ते सहज पटेल. त्यासाठी थोडा अधिक विचार करा. अंतःकरणातील त्या देवाशी तुम्ही प्रामाणिकपणाने वागलात तर तुम्हाला नेहमीच सुखाचा आनंद दिसेल. म्हणून त्या कृपाळू रामप्रभूची मनात आठवण ठेवा, त्याला विसरू नका.
मुलांनी काय करावे?
तुमच्या मनातील देव शोधा. त्याला जागे करा. (त्याची नेहमी आठवण करा) त्याच्यावर विश्वास ठेवा. त्याला कधीच फसवू नका. (उदा. एखादी चोरी केली. थोडे पैसे मिळाले. मित्राबरोबर चैन केली. काही काळ बरे वाटेल. ही गोष्ट घरात कुणालाच कळली नसली, तरीसुद्धा ती तुमच्या अंतःकरणातील देवाला आधीच कळलेली असते.
काही वेळानंतर तुम्ही शांतपणाने विचार केलात, तर तुमची ती चूक तुम्हाला निश्चित पटेल. वाईट वाटेल. अशा वेळी देवाची-रामरायाची क्षमा मागा. (रामासारखेच सत्याने वागण्याचा निग्रह करा.) नेहमी खरेपणाने वागण्याची सवय मनात भिडली की तुम्हाला नेहमीच ‘सुखाचा’ आनंद मिळेल. तोच संसारी जीवनातील ‘मोक्ष’ (स्वर्ग) समजता येईल; म्हणून त्या कृपाळू रामरायाला विसरू नका!
उपेक्षा कदा रामरूपी असेना ।
जिवा मानवा निश्चयी तो वसेना ।
शिरी भार वाहेन बोले पुराणी ।
नुपेक्षी कदा राम दासाभिमानी ।।
शब्दांचे अर्थ : उपेक्षा – हयगय / विस्मरण, वसेना – टिकत नाही, भार – जबाबदारी, वाहेन सोशीन, नुपेक्षी विसरू नका.
अर्थ : प्रभू रामाची हयगय करू नका. त्याला विसरू नका. त्याच्यावर पूर्ण निष्ठा ठेवा. पण ही निष्ठा टिकत नाही. ती पूर्णपणे टिकली तर तुमच्या सर्व संकटांचे व रक्षणाचे ओझे तो राम स्वतःवर घेईल. तुमच्या अडचणी दूर होतील. असेच रामायण या ग्रंथात (पुराणात) सांगितले आहे. म्हणूनच प्रभू रामाची अखंड भक्ती करा.
मुलांनी काय करावे?
तुमचे मन निग्रही बनवा. धीटपणा वाढवा. रामरायावर व घरच्या देवांवर निष्ठा ठेवा. तो तुमच्या सर्व अडचणी दूर करील. कुठल्याही अडचणीत नेहमी ‘धाव रामा’, ‘धाव रामा’ असा धावा करा. काय अनुभव येईल तो पहा.
मना श्रेष्ठ धारिष्ट जीवी घरावे ।
मना बोलणे नीच सोशीत जावे ।
स्वये सर्वदा नम्र वाचे वदावे ।
मना सर्व लोकांसि रे नीववावे ॥
शब्दांचे अर्थ : धारिष्ट – निग्रह / नम्र शांतपणे, वाचे – तोंडाने, बदावे – बोलावे, नीववावे – समाधानी ठेवावे (वाईट बोलून दुखवू नये)
अर्थ : हे मानवा, तू नेहमीच निग्रहाने वाग. अशा वेळी धीटपणाही ठेव. तो मात्र सोडू नको. कुणीही वाईट किंवा अपमानाचे बोलणे बोलले, तरी ते अगदी शांतपणाने सोशीत जा. तू स्वतः मात्र नम्रपणाने व आनंदानेच बोलत जा ते ऐकून सर्वांना समाधान वाटेल. तुझे कौतुक होईल.
मुलांनी काय करावे ?
मन निग्रही व धीट ठेवा. दुसऱ्याचे वाईट बोलणे अगदी शांतपणाने सहन करा. तुम्ही स्वतः अगदी नम्रपणाने व आनंदी वृत्तीनेच बोलत जा. ते ऐकून सर्व लोकांना समाधान वाटेल. हा निश्चय पूर्ण आयुष्यात टिकवा.
नको रे मना द्रव्य ते पूढिलांचे ।
अति स्वार्थ बुद्धी नरे पाप साचे ।
घडे भोगणे पाप ते कर्म खोटे ।
न होता मनासारिखे दुःख मोठे ।।
शब्दांचे अर्थ : द्रव्य – पैसे/धन, पूढिलांचे – दुसऱ्यांचे, स्वार्थ – स्वतःचा फायदा, नरे – मानव.
अर्थ : हे मानवा, दुसऱ्यांची दिसणारी श्रीमंती किंवा पैसा पाहून तू कधीच तशी हावरी अपेक्षा करू नको. असली स्वार्थबुद्धी (पैसे मिळण्याची) म्हणजे पाप आहे. स्वकष्टाची कमाई हेच खरे समाधान ! समाधान हे पैशात नसते, ते आपण आपल्या मनाने ठरवायचे असते! एखादी गोष्ट मनासारखी घडली नाही तरीही त्याचे दुःख मानू नको.
मुलांनी काय करावे?
स्वतः कष्टानेच पैसे मिळवा. मनात दुसऱ्याच्या पैशांचा विचार कधीच आणू नका. स्वकष्टाने मिळेल त्यातच समाधान माना. ‘यत्न तो देव जाणावा’ हे सूत्र कधीच विसरू नका! तुम्ही नेहमीच सुखी रहाल !