manache shlok with meaning in marathi
Manache Shlok With Meaning in marathi। मनाचे श्लोक अर्थ सहित
manache shlok with meaning in marathi | Manache Shlok Lyrics
सदा सर्वदा प्रीती रामी धरावी ।
दुखाची स्वये सांडि जीवी करावी ।
देहे दुःख ते सूख मानीत जावे ।
विवेके सदा सस्वरूपी भरावे ।।
शब्दांचे अर्थ : स्वये – स्वतः सांडि दुर्लक्ष (विस्मरण), विवेक – विचार, सस्वरूप – तुमच्या मनातील रूपाशी (अंतर्मनाशी).
अर्थ : मानवा, रामावरचे प्रेम कधीच कमी करू नको. ते निग्रहाने टिकव. स्वतः कधी दुःख झाले तर त्याच्याकडे दुर्लक्ष करून ते विसरण्याचा प्रयत्न कर. जीवनात सुख-दुःखंही पहावीच लागतात. ती चुकत नाहीत. संकटाच्या वेळी थोड्या शांतपणाने विचार करून मनाला धीर देत जा.
फुकाचे मुखी बोलता काय वेचे ।
दिसेंदीस अभ्यंतरी गर्व साचे ।
क्रियेवीण वाचाळता व्यर्थ आहे ।
विचारे तुझा तूंचि शोधूनि पाहे ।।
शब्दांचे अर्थ : मुखी तोंडाने दिसेंदीस अभ्यंतरी – मनात, साचे वाढतो, क्रियेवीण बडबड, व्यर्ष – फुकट, विचारे – विचार करून, दिवसांमागोमाग, कृतीशिवाय, वाचाळता.
अर्थ : मनात येईल, ते तोंडाने फुकटचे बोलायला काहीच बिघडत नाही. अशाने मनात फुकट गर्व मात्र वाढेल. कुठलीही गोष्ट प्रत्यक्ष कृतीशिवाय बोलणे किंवा सांगणे अथवा बडबडणे फुकट असते. या गोष्टीचा तुझा तूच विचार कर व त्यातून चांगले काय ते शोधून पहा.
देहे त्यागिता कीर्ति मागे उरावी ।
मना सज्जना हेचि क्रीया धरावी ।
मना चंदनाचे परि त्वा झिजावे ।
परी अंतरी सज्जना नीववावे ।।
शब्दांचे अर्थ : त्यागिता – सोडल्यावर, झिजावे – झटावे, अंतरी – मनातून, सज्जना – सर्व लोकांना.
अर्थ : मनुष्य केव्हातरी मरणारच ! पण त्याच्या मृत्यूनंतरही सर्व लोकांनी त्याची चांगली आठवण ठेवावी. त्याने आपल्या आयुष्यात खूप चांगल्या गोष्टी केलेल्या असाव्या, की ज्यामुळे त्याची कीर्ती लोक कधीच विसरणार नाहीत. मानवा, तुझा देह दुसऱ्यांसाठी नेहमी चंदनासारखा झिजू दे. म्हणजेच तू नेहमी लोकांच्या उपयोगी पडत जा. सर्व लोकांना नेहमी सर्व लोकांना नेहमी संतोष देत जा. सुख देत जा.
मना सांग पा रावणा काय झाले ।
अकस्मात ते राज्य सर्वे बुडाले ।
म्हणोनी कुडी वासना सांडि वेगी ।
बळे लागला काळ हा पाठिलागी ।।
शब्दांचे अर्थ : अकस्मात – अचानक, सर्वे – सर्व.
अर्थ : लंकेचा राजा रावण! त्याला कशाचीच उणीव नव्हती. पण तो गर्विष्ठ होता. त्याची वागणूक अगदी वाईट होती (दुष्ट होती), त्यामुळे त्याचे सर्व राज्य बुडाले. (राम-रावणाच्या युद्धात तो मारलाच गेला.) दुष्ट माणसाच्या मागे काळ त्याला छळीतच असतो. म्हणून माणसाने नेहमीच दुष्टपणा सोडायला हवा.
मना पाहता सत्य हे मृत्युभूमी ।
जिता बोलती सर्वही जीव मी मी ।
चिरंजीव हे सर्वही मानिताती ।
अकस्मात सोडूनिया सर्व जाती ॥
शब्दांचे अर्थ : मृत्युभूमी – पृथ्वी, जिता – जिवंत.
अर्थ : हे मानवा, या जगात सत्य हेच सर्वांत श्रेष्ठ आहे. सर्व माणसांनी नेहमी आयुष्यात सत्यानेच वागावे. सर्व जिवंत माणसे हे तत्त्व मान्यच करतील. पण आयुष्य संपताच सर्वजण हे जगच सोडून जाणार आहेत. यासाठी आपल्या आयुष्यात सत्यधमनिच वागणे हे प्रत्येकाचे कर्तव्य आहे.
मना मानव व्यर्थ चिंता बहाते ।
अकस्मात होणार होऊनि जाते ।
घडे भोगणे सर्वही कर्मयोगे ।
मतीमंद ते खेद मानी वियोगे ।।
शब्दांचे अर्थ: चिंता – काळजी. अकस्मात – अचानक. कर्मयोगे – नशिबात असेल तसे. खेद – दुःख.
अर्थ : हे मानवा, तू नसती काळजी कधीच करू नको. जे बरे-वाईट व्हायचं असेल ते अचानक होते. तो आपल्या नशिबाचा भाग समज; पण ज्यांना दूरवर विचार करता येत नाही, ते मात्र अशा गोष्टींची उगाच काळजी करतात.
मना राघवेवीण आशा नको रे ।
मना मानवाची नको कीर्ती तू रे ।
जया वर्णिती वेदशास्त्रे पुराणे ।
जया वर्णिता सर्वही श्लाघ्यवाणे ।।
शब्दांचे अर्थ : राघवेवीण – रामाशिवाय, श्लाघ्यवाणे – स्तुत्य, उपयुक्त.
अर्थ : हे मानवा, तू मनापासून फक्त प्रभूरामरायांचीच स्तुती कर. कोणत्याही मनुष्याची स्तुती करणे, त्याचे गुणगान करून त्याची प्रसिद्धी करणे यात काहीच फायदा नाही. ज्या रामरायाची सर्व शास्त्रे व पुराणे नेहमी थोरवी सांगतात, त्या रामाच्या चिंतनात तू गुंतून रहाणे हेच उपयुक्त ठरेल, हिताचे होईल.
मना वीट मानू नको बोलण्याचा ।
पुढे मागुता राम जोडेल कैसा ।
सुखाची घडी लोटता दुःख आहे ।
पुढे सर्व जाईल काही न राहे ।।
शब्दांचे अर्थ : बीट – कंटाळा. घडी – वेळ (काळ).
अर्थ : समर्थ सर्वांना सांगतात, मी जो उपदेश करतो, तो ऐकून कंटाळू नका. त्याच्याकडे दुर्लक्षही करू नका. तसे केल्यास रामाची सोबत मिळणार नाही. आयुष्यात सुखाचे दिवस संपले, की दुःखाचे दिवसही येतात. त्यामुळे तुझ्या मनाला त्रासही होईल. पण त्यातही रामाचे स्मरण कर, नाहीतर तुझे सगळे वैभव, कीर्ती व भरभराट नाहीशी होईल. काहीच उरणार नाही. म्हणून रामावर विश्वास ठेव. त्याच्या सेवेत खंड करू नको!
दीनानाथ हा राम कोदंडधारी ।
पुढे देखता काळ पोटी थरारी ।
जनी वाक्य नेमस्त हे सत्य मानी ।
नुपेक्षी कदा राम दासाभिमानी ।।
शब्दांचे अर्थ: कोदंडधारी – धनुष्य धरणारा, दीनानाथ – गरिबांचा सोबती, काल – यम, थरारी थरथरतो, घाबरतो, नेमस्त – सत्य, खरे.
अर्थ : गरिबांचा सोबती राम हाच तुमचाही सोबती आहे. त्याचा आधार नेहमी मिळेल. या रामाचा दरारा एवढा, की प्रत्यक्ष यमाने त्याला पाहिले, तर यमही घाबरतो. त्याला भीतीचे कापरे भरते, हे लक्षात ठेवा. रामाला त्याच्या दासाचा नेहमीच अभिमान असतो. तो त्याला काहीच कमी पडू देणार नाही.
सदा रामनामे वदा पूर्ण कामे ।
कदा बाधिजेना पदा नित्य नेमे ।
मदालस्य हा सर्व सोडोनि द्यावा ।
प्रभाते मनी राम चिंतीत जावा ।।
शब्दांचे अर्थ : पदा – अडचणीशिवाय, मदालस्य – अहंकार (गर्व) आळशीपणा.
अर्थ : मनाची इच्छा नेहमी पूर्ण करणाऱ्या रामरायाला कधीच विसरू नका. त्याचे स्मरण अखंड टिकवा. त्यामुळे संकटे येणार नाहीत व आलीच तर बाधा (त्रास) होणार नाही. मनातला अहंकार व आळशीपणा मात्र सोडून द्या. पहाटे उठून रामनामात रंगून जा.
जगी धन्य तो रामसूखे निवाला ।
कथा ऐकता सर्व तल्लीन झाला ।
देहेभावना रामबोधे उडाली ।
मनोभावना रामरूपी बुडाली ।।
शब्दांचे अर्थ : निवाला – शांत झाला, तल्लीन – एकरूप, देडभावना – शरीराची स्थिती, मनोवासना – मनातीला इच्छा, रामबोधे – रामाच्या उपदेशात.
अर्थ : रामभक्तीच्या श्रवणाने जो शांत झाला, त्या कथांत रंगून गेला, कथा ऐकता ऐकता देहभान विसरला, (म्हणजेच पूर्ण तृप्त झाला) ज्याच्या सर्व भावना रामस्वरूपी बनल्या तो मनुष्य या जगात खरोखरच श्रेष्ठ समजावा. तो खरा धन्य!