सार्थ पंचमुखी हनुमत्कवचम् ॥
panchmukhi hanuman kavach lyrics
ॐ श्रीहरिगुरुभ्यो नमः ।। हरिः ॐ ।।
अस्य श्रीपंचमुखी-वीर-हनुमत्कवचन- स्तोत्रमंत्रस्य ब्रह्मा ऋषिः।
गायत्री छन्दः ।
पंचमुखी श्रीरामचंद्ररूपी परमात्मा देवता ।।
बीजम्। न्हीं शक्तिः । चंद्रः इति कीलकम् ।।
पंचमुखांतर्गत श्रीरामचंद्ररूपी परमात्मा-प्रसाद- सिद्ध्यर्थे जपे विनियोगः ।।
अर्थ: ॐ प्रथम श्रीहरी आणि श्री गुरूंना वंदन करावे. या पंचमुखी वीर हनुमत् कवच स्तोत्रमंत्राचा निर्माता हा द्रष्टा ऋषी ब्रह्मदेव आहे. त्या स्तोत्राचा छंद हा गायत्री छंद आहे. पाच मुखे असणारा आणि श्रीरामरूपाशी एकरूप असलेला रामभक्त हनुमान ही ह्या कवचाची देवता आहे. ‘हां’ हे ह्या स्तोत्राचे बीज आहे, ‘नहीं’ ही शक्ती आहे; तर ‘चंद्र’ ही ह्या कवचाची किल्ली आहे. श्री रामचंद्ररूपी परमात्म्याचा कृपाप्रसाद प्राप्त व्हावा, हाच ह्या कवच स्तोत्रमंत्राचा खरा विनियोग आहे.
करन्यासः I
ॐ हां अंगुष्ठांभ्यां नमः ।।
ॐ हीं तर्जनीभ्यां नमः ।।
ॐ हूं मध्यमाभ्यां नमः ।।
ॐ हैं अनामिकाभ्यां नमः ।।
ॐ हाँ कनिष्ठिकाभ्यां नमः ।।
ॐ हः करतलकरपृष्ठाभ्यां नमः ।।
इति करन्यासः।
अर्थ: हां’ असे म्हणून दोन्ही हाताच्या अंगुष्ठांना, म्हणजेच हातांच्या आंगठ्यांना नमस्कार करावा. ‘ॐ नहीं’ असे म्हणून पहिल्या बोटाला नमस्कार करावा. ‘ॐ हूं’ असे म्हणून मधल्या बोटाला वंदन करावे. ‘ॐ हैं’ असे म्हणून करंगळीजवळच्या बोटाला नमस्कार करावा. ‘ॐ हौं’ असे म्हणून करंगळ्यांना; तर ‘ॐ न्हः’ असे म्हणून दोन्ही तळहातांना व उपड्या हातांना नमन करावे.
हृदयादि न्यासः ।
ॐ हां हृदयाय नमः ।
अर्थ: उजव्या हाताने हृदयास स्पर्श करावा.
ॐ हीं शिरसे स्वाहा।
अर्थ: उजव्या हाताने मस्तकाला स्पर्श करावा.
ॐ हूं शिखायै वषट।
अर्थ: डोक्याच्या मागील भागास म्हणजे शेंडीच्या जागी उजव्या हाताने स्पर्श करावा.
ॐ हैं कवचाय हूं।
अर्थ: आपले दोन्ही हात जोडून ते आपल्याच छातीकडे वळवावेत.
ॐ हौं नेत्रत्रयाय वौषट् ।
अर्थ: उजव्या हाताचा आंगठा उजव्या डोळ्यावर, तर्जनी दोन्ही डोळ्यांच्या मधील भूमध्यावर; तर अनामिका ही डाव्या डोळ्यावर ठेवावी.
ॐ हः अस्त्राय फट् ।
अर्थ: उजव्या हाताच्या मधल्या दोन बोटांनी डाव्या हातावर फट्कन टाळी वाजवावी.
इति हृदयादि न्यासः । ॐ भूर्भुवस्वरोम् । अथ दिग्बंधः।
ॐ कं खं गं घंङचं छं जं झं अं टं ठं डं ढं णं तं थंदं
धं नं पं फं बं भं मं यं रंलं वंशं षं सं हं ळं क्षं ज्ञं स्वाहा।
अर्थ: ह्या कवच स्तोत्रमंत्रातल्या ह्या सर्व अक्षरांचा उच्चार करून आपला उजवा हात आपल्याच भोवती फिरवून घ्यावा. ह्या कृतीमागे जणू हे कवच आपण स्व-संरक्षणार्थ शरीराभोवती पांघरत आहोत आणि त्यामुळे आपण पूर्ण सुरक्षित झालो आहोत, असा भाव असावा. येथे स्वाहाकारही करण्याची पद्धत आहे.
अथ ध्यानम् ॥
वंदे वानर नारसिंह-खगराट्- क्रोट्रा-अश्व-वक्त्रान्वितम् ।
दिव्यालंकरणं त्रिपंचनयनं दैदीप्यमानं स्रजा ॥
हस्ताब्जैरसिखेट-पुस्तकसुधा-कुंभं कुशादीन् हलान् ।
खट्वांगं कनिभूरुहं दशभुजं सर्वारिदर्पापहम् ॥१॥
अर्थ: ज्याला वानर, गरुड, नरसिंह, सूकर आणि अश्व म्हणजेच घोडा अशी पाच मुखे आहेत, ज्याला पंधरा डोळे आहेत, ज्याच्या विशाल छातीवर माळ शोभून दिसते आहे, ज्याने आपल्या हातात तलवार, खेट, पुस्तक, अमृताचा कुंभ, दर्भ, नांगर व खटवांग धारण केलेले आहे, अशा ह्या दहा हातांच्या आणि सर्व शत्रूचा नाश करणाऱ्या श्री पंचमुखी हनुमंतरायास माझा नमस्कार असो.
पंचवक्त्रं महाभीमं त्रिपंचनयनैर्युतम् ।
दशभिर्बाहुभिर्युक्तं सर्वकामार्थ-सिद्धिदम् ॥२॥
अर्थ: जो पंचमुखी आहे, ज्याला पंधरा डोळे आहेत, जो भय निर्माण करणारा आहे, ज्याचे दहाही हात हे सर्व मनोकामना पूर्ण करण्यासाठी सदैव सिद्ध आहेत, अशा श्री पंचमुखी हनुमानाची आम्ही मनःपूर्वक भक्ती करत आहोत.
पूर्वे तु वानरं वक्त्रं कोटिसूर्य समप्रभम् ।
दंष्ट्राकरालवदनं भृकुटीकुटिलेक्षणम् ॥३॥
अन्यं तु दक्षिणे वक्त्रं नारसिंहं महाद्भुतम् ।
अत्युग्रतेजो ज्वलितं भीषणं भयनाशनम् ॥४॥
अर्थ: हा पंचमुखी हनुमान आपल्या वानरमुखाने पूर्वेकडे पाहात आहे. त्याचे तेज हे कोटी सूर्याप्रमाणे आहे. अंक्राळ-विक्राळ दिसणारे, बाकड्या भिवया असणारे त्याचे हे उग्र दृष्टीने पाहणारे रूप आहे. त्याचे दुसरे दक्षिणेकडचे मुख हे नृसिंहाचे असून ते जरी उग्र असले, तरी भक्ताच्या मनातील भीती घालवून प्रेम निर्माण करणारे आहे.
पश्चिमे गारुडं वक्त्रं वज्रतुंडं महाबलम् ।
सर्वरोगप्रशमनं विषभूतादिकृंतनम् ॥५॥
उत्तरे सूकरं वक्त्रं कृष्णादित्यं महोज्ज्वलम् ।
पातालसिद्धिदं नृणां ज्वररोगादिनाशनम् ॥६॥
ऊर्ध्व हयाननं घोरं दानवान्तकरं परम् ।
येन वक्त्रेण विप्रेंद्र ! सर्वविद्याः विनिर्ययुः ॥७॥
अर्थ: त्याचे पश्चिमेचे मुख हे गरुडाचे असून त्याची चोच फार तीक्ष्ण आहे. ह्या मुखाचे दर्शन हे भक्ताला बल देणारे, त्याची रोग, विष आणि भूत-पिशाच ह्यांच्या बाधेपासून सोडवणूक करणारे आहे. ह्या पंचमुखी हनुमानाचे उत्तर दिशेकडील मुख हे वराहमुख आहे. त्याचा रंग कृष्णवर्णीय तेजस्वी असून ते पाताल लोकासंबंधी सिद्धी देणारे आहे. त्या मुखदर्शनाने उपासकाच्या नाना प्रकारचे ज्वर व रोगांचा नाश होतो. त्याचे ऊर्ध्व दिशेला वळलेले मुख हे घोड्याचे असून ते दानवांचा नाश करणारे आहे. ह्या अश्वमुखातूनच सर्व विद्या प्रगट झाल्या आहेत.
एतत्पंचमुखं तस्य धारयत्तु भयंकरम् ।
खड्गं त्रिशूलं खट्वांगं परश्चंकुश पर्वतम् ॥८ ॥
खेटासीनि पुस्तकं च सुधाकुंभं हलं तथा ।
एतान्यायुधजातानि धारयन्तं भजामहे ॥९॥
अर्थ: महाभयंकर असे खड्ङ्ग, त्रिशूल, गदा, खट्वांग, परशू, पर्वत, खेट, असि, पुस्तक आणि अमृतकुंभ इ. आयुधे ज्या हनुमानाने धारण केली आहेत, अशा श्री पंचमुखी हनुमानाची आम्ही मनोभावे भक्ती करत आहोत.
प्रेतासनोपविष्टं तु दिव्याभरणभूषितं ।
दिव्यमालांबरधरं दिव्यगंधानुलेपनम् ॥१०॥
सर्वेश्वर्यमयं देवमनंतं विश्वतोमुखम् ।
एवं ध्यायेत्पंचमुखं सर्वकामफलप्रदम् ॥११॥
अर्थ: प्रेतासनावर बसलेला, म्हणजेच मृत्यूवरही जो विजय मिळवणारा आहे, जो दिव्य अलंकारांनी विभूषित आहे, ज्याच्या गळ्यात तेजस्वी फुलांच्या माळा आहेत, ज्याच्या मस्तकावर दिव्य गंधाचे लेपन आहे, जो अनंत, ऐश्वर्यवान आहे, जो भक्तांच्या मनीच्या सर्व कामना पूर्ण करणारा आहे, अशा सर्व विश्वाला नेहमी समोर असणाऱ्या त्या पंचमुखी हनुमंताचे मी मनःपूर्वक ध्यान करतो.
पंचास्यमच्युतमनेकविचित्रवीर्यम् । श्रीशंखचक्ररमणीयभुजाग्रदेशम् ।।
पीतांबरं मुकुटकुंडलंनूपुरांगम् । उद्योतितं कपिवरं हृदि भावयामि ॥१२॥
अर्थ: जो पीतांबरधारी आहे, ज्याचे कानांत कुंडले शोभत आहेत, ज्याच्या पायांत मंजूळ नादमयी नूपुरे आहेत, जो अनेकविध पराक्रम करणारा आहे, अशा श्रेष्ठ, पराक्रमी नि तेजस्वी पंचमुखी कपिवर श्री हनुमंताचे मी ध्यान करतो.
चंद्रार्धं चरणारविंदयुगलं कौपीनमौंजीधर ।
नाभ्यां वै कटिसूत्रबद्धवसनं यज्ञोपवीतं शुभम् ॥
हस्ताभ्यामवलम्ब्य चाञ्जलिपुटं हारावलिं कुंडलम् ।
बिभ्रद्वीर्यशिखं प्रसन्नवदनं विद्याञ्जनेयं भजे ॥१३॥
अर्थ: श्री पंचमुखी हनुमंताची दोन्ही पावले अर्धचंद्रासारखी आहेत. त्याने कौपीन व नाभीजवळ मेखला धारण केली आहे. कमरेभोवती वस्त्र बांधले आहे. त्याच्या गळ्यात शुभ्र जानवे शोभते आहे. आपले दोन्ही कर जोडून जो प्रभू रामरायाला नमन करतो आहे. अशा कानी कुंडले, कंठी पुष्पांसह अनेक मौतिक-माळा शोभत असणान्या पराक्रमी, श्रेष्ठ, ज्ञानवंत, बुद्धिवंत, विद्यावंत अशा अंजनीपुत्राचे मी भजन करतो, त्याला वंदन करतो; आणि त्याची मनोभावे भक्ती करतो आहे. ॐ मर्कटेश महोत्साह सर्वशोकविनाशक । शत्रून्संहर मां रक्ष श्रियं दापय मे प्रभो ॥१४॥
इति ध्यानम् ।।
अर्थ: ॐ ! हे मर्कटेश्वरा ! हे उत्साही कपिराजा ! तू सर्व शोकांचा, दु:खांचानाश करणारा आहेस. तू शत्रु-संहारक आहेस. तेव्हा हे प्रभो ! तू माझा अंतर्बाह्य सांभाळ कर. तू माझे रक्षण कर. तुझ्या कृपेने मला सर्व संपदा प्राप्त होऊ दे, अशी मी तुझ्या चरणी प्रार्थना करतो. (ह्या प्रकारे त्या श्री पंचमुखी हनुमानाचे ध्यान करून त्याला प्रार्थना करावी.)