श्री संत ज्ञानेश्वराच्या माहिती गोष्टी स्वरूपात
Sant Dnyaneshwar Information In Marathi
विठ्ठलपंत
फार पूर्वींची कथा आहे ही!
सुमारे सहाशे-सातशे वर्षांच्या मागील, पण मोठी मजेदार, तितकीच खऱ्या नवलाची. सर्वांनाच नवल वाटेल अशी.
आपेगावला विठ्ठलपंत नावाचे एक गृहस्थ रहात होते. त्यांचे आडनाव कुलकर्णी. गावचं वतन होतं. वतनाचे पैसे मिळत होते; त्यात घरखर्च भागे. घरची माणसं सुखासमाधानात रहात होती.
विठ्ठलपंतांच्या घरी विठ्ठलाची पूजा होई. पंढरीनाथांच्या भक्तीत सारे रंगून जात. त्यांचे वाडवडील पंढरपुरलाही जात असत. पांडुरंगाचं दर्शन घेत असत. घरी येऊन पुन्हा संसारात रमत असत. विठ्ठलपंत पंधरा-सोळा वर्षांचे झाले आणि आळंदीच्या सिद्धोपंतांच्या मुलीशी त्यांचं लग्न झालं. आणि हे दांपत्य आपेगावला सुखात राहू लागलं. विठ्ठलपंतांच्या पत्नीचं नावं होतं रुक्मिणीदेवी. या नव्या घरातही ती लवकरच रुळली. घरची कामं करू लागली. सासूला मदत करू लागली. सासऱ्यांच्या देवपूजेची सारी तयारी करू लागली. घरातील सर्वांना ती आवडू लागली.
दिवस भराभर संपत होते. विठ्ठलपंतांचा वेदांचा अभ्यास चालू होता. गुरुजी जे सांगतील, त्याचं पाठांतर चालू होते. पाठ झालेला भाग ते गुरुजींना म्हणून दाखवीत. त्यात कुठलीच चूक नसे. गुरुजी त्यांना शाबासकी देत, त्यांचं कौतुक करीत.
हा क्रम काही वर्षे चालू होता. पण विठ्ठलपंतांचं लक्ष घरात रमत नव्हतं. रुक्मिणीशीही ते फारसं बोलत नसत. त्यांच्या मनात काय आहे, ते कुणालाच कळत नव्हतं. पत्नीनं विचारलं, तर तिलाही ते काहीच सांगत नसत. रिकाम्या वेळात पांडुरंगाचं नामस्मरण चाले. आणि …. आणि एक दिवस अगदी अचानक ते घरातून बाहेर पडले. कुठे गेले याचा थांगपत्ता कुणालाच सांगता येत नव्हता.
घर सोडलं, अन् ते थेट काशीला गेले. तिथे थोर रामानंद स्वामींना भेटले. त्यांना नमस्कार केला. हात जोडून उभे राहिले, ‘मी संन्यास घेऊन आलोय! तुमचा शिष्य म्हणून इथेच रहाणार आहे. मला तुम्ही खूप शिकवावं ही माझी इच्छा आहे. ती पूर्ण व्हावी, ही प्रार्थना आहे.’ हात जोडून विनम्रतेने त्यांनी स्वामींना म्हटले.
त्या तरुण मुलाची स्वामींनी अधिक चौकशी केली. त्याची तरतरीत बुद्धी, उमदा चेहरा, गोड बोलणं व शांत वृत्ती स्वामींना पटली. त्यांनी त्याला आपल्या आश्रमात ठेवून घेतलं. विठ्ठलपंतांना समाधान वाटलं.
विठ्ठलपंत आता काशीला राहू लागले. घरच्या साऱ्या आठवणी ते पार विसरल्या. इतर शिष्यांबरोबर तेही पुढचा वेदाभ्यास करू लागले. नव्या वातावरणात व नव्या सहकाऱ्यांत ते रंगून गेले होते.
Alandi Mandir। पुन्हा आळंदी
आपेगावहून विठ्ठलपंत कुठे गेले, ते रुक्मिणीबाईंना कळलंच नव्हतं. काही दिवस ती तिथे राहिली. पण तिथे त्यांचे मन रमेना. घरात चैन पडेना. शेवटी ती आळंदीला परत आली. वडिलांकडे राहू लागली.
रोज सकाळी लवकर उठावं, इंद्रायणीवर जावं, अंग धुणं उरकावं, सिद्धेश्वराचं दर्शन घ्यावं व शेजारच्या पिंपळाभोवत्ती प्रदक्षिणा घालाव्यात, असा क्रम सुरू होता.
इत्तरही काही बायका पिंपळाला प्रदक्षिणा घालायला येत. प्रत्येकीच्या हाती माळ असे. एकेक प्रदक्षिणा पुरी झाली की माळेचा एक मणी ओढला जाई. तिथे कुणीही एकमेकीशी बोलत नसत्. आपलं काम निमूटपणे करण्यात त्या रंगून जात असत. दुपारपर्यंत प्रदक्षिणेचे काम चाले. नंतर घरी यावं, जेवण करावं, विश्रांती घ्यावी, सिद्धेश्वराच्या देवळात काही कार्यक्रम असला तर तिथे जावं, तो पहावा, असा नित्याचा कार्यक्रम असे.
नित्याप्रमाणे स्त्रिया पिंपळाच्या पाराशी आल्या. त्यांच्या आधीच एक तेजस्वी सत्पुरुष त्या पारावर येऊन बसला होता.
तोंडानं कसला तरी जप चालू होता. काही सुवासिनींनी त्यांना पाहिलं. चार पावलं पुढे जाऊन त्यांनी त्या सत्पुरुषाला नमस्कार केला.
सत्पुरुषानं कुणाला ‘सुस्वी भव’ असा आशीर्वाद दिला तर कुणाला ‘आयुष्यमान भव’ असा आशीर्वाद दिला. रुक्मिणीनंही त्यांना नमस्कार केला. तिला ‘पुत्रवती भव’ असा आशीर्वाद, दिला.
रुक्मिणी मटकन् खाली बसली. तिचे डोळे भरून आले. तोंडून एक शब्दही फुटेना. स्वामींना काहीच कळेना! ते म्हणाले, ‘बाळे, का. रडतेस? काय दुःख आहे तुझं? अगदी मोकळ्या मनानं सांग’. रुक्मिणीनं डोळे पुसले. दुःख आवरलं आणि ती स्वामींना सांगू लागली-
‘महाराज, माझे पती मला सोडून दूर गेले आहेत.. त्यांची मला मुळीच माहिती नाही. मी इथे एकटी आहे. इथे वडिलांकडे रहाते. तुम्ही मला आशीर्वाद दिला. त्याचं फळ मला कसं दिसणार? मी काय करू? कुठे जाऊ? काही काही सुचत नाही मला! वाटतं, इंद्रायणीत जीव द्यावा, अन् मोकळं व्हावं!’ एवढं बोलून ती पुन्हा रडू लागली. तेव्हा मोठ्या ममतेने स्वामींनी म्हटलं, ‘ असा वेडेपणा नाही करायचा! तुझ्या पतीचं नाव मला सांगशील?’
‘त्यांचं नावं विठ्ठलपंत’. खालमानेनंच तिनं स्वामींना उत्तर दिलं.
‘त्याचं इतर वर्णन सांगशील?’ स्वामींनी विचारलं.
रुक्मिणीनं थोडक्यात ती माहितीही स्वामींना दिली. इतर स्त्रियांनीही ती ऐकली. एकीनं खवचटपणानं विचारलं, ‘स्वामी, तुमचा आशीर्वाद या जन्मात फळाला येणार की पुढच्या?’
त्यावर शांतपणे स्वामी म्हणाले, ‘काही काळ थांबा, काय घडेल ते आपोआप दिसेल!’ मग स्वामी रुक्मिणीबाईंना म्हणाले, ‘मुली, चिंता सोड. सिद्धेश्वराच्या कृपेने तुला पूर्ण समाधान झालेलं दिसेल. विश्वास ठेव.’
हे स्वामी म्हणजेच काशीचे रामानंद स्वामी ! दक्षिणेत तीर्थयात्रेला आले होते ते. त्यांच्याच आश्रमात विठ्ठल हा शिष्य म्हणून शिकत होता. तोच या दुःस्वी बाईचा पती असावा, ही त्यांच्या मनाची खात्री झाली.
बाईला धीर दिला. ते पुढची क्षेत्र पाहून परत काशीला आले. मनातले विचार सतावीत होते. पण आल्याबरोबर ते कुणाशीही बोलले नाहीत. एक-दोन दिवस त्यांच्या मनातील अस्वस्थता सारखी चालू होती आणि नंतर….
स्वामींचा राग
सकाळची वेळ होती. सर्व शिष्य पुढचा पाठ घेण्यास जमले होते. स्वामीही देवपूजा संपवून आले होते. पण ते नेहमीसारखे खुषीत दिसत नव्हते. ते स्वस्थ बसले होते. सर्व शिष्यांकडे पहात होते. कुणालाच काही कळत नव्हतं.
स्वामी करड्या आवाजात म्हणाले, ‘विठ्ठल, मी विचारलेल्या प्रश्नांची खरी खरी उत्तरं देशील? मला आता मागचा सारा प्रकार कळला आहे., म्हणून विचारतोय, केवळ स्वात्री व्हावी म्हणून!’
‘होय महाराज! आपल्या प्रश्नांची मी नीट उत्तरं देईन!’
‘तू इथे आलास, तेव्हा संन्यास घेऊन आल्याचं सांगितलंस. तो घेण्यापूर्वी बायकोची परवानगी घेतली होतीस? तिला न सांगताच तू इथे आलास! मला खोटं सांगितलंस. पत्नीच्या परवानगीशिवाय संन्यास घेणं हे शास्त्राविरुद्ध नाही? तू खोटं बोलून फसवलंस मला !
‘स्वामी महाराज, संसाराचे सर्व मोहपाश सोडणं, त्यातून कायमचं मोकळं होणं म्हणजे संन्यास नाही का? मला आता कुठलाही मोह नाही. मी मुक्त झालो आहे.’ विठ्ठलपंतांनी म्हटलं. त्यावर स्वामी रागानं म्हणाले, ‘तसं शास्त्रात सांगितलं नाही. तुझा तर्क आणि ग्रंथातला आधार वेगळे आहेत. मी आधार श्रेष्ठ मानतो.’
विठ्ठलाचं तोंड बंद झालं होतं. तो ओशाळला होता. स्वामींकडे पहात होता. तोंडातून शब्द फुटत नव्हता. इतर शिष्य सहकारी त्याच्याकडे पहात होते. विठ्ठल खाली मान घालून बसला होता. शेवटी तो म्हणाला, ‘स्वामी, मी चुकलो स्वरा, पण आता काय करू मी?’
‘घरी जा अन् संसार कर’ !
‘संन्याशाने पुन्हा संसार सुरू केला, म्हणून सारे लोक माझी टिंगल-टवाळी करतील’.
काही दिवस ती सहन करायलाच हवी. ती एक कसोटीच ठरेल. पुढचा सूर्यप्रकाश सर्वांचा अंधार दूर करील. पत्नीच्या दुःस्वाचा विचार पहिला, इतरांचा त्यानंतरचा! तेव्हा मी जे सांगतो तसं तू वाग. तुम्हा दोघांना जी मुलं होणार आहेत, ती जगाला दिपवतील! स्वतःच्या बुद्धीनं सर्वांना चकित करतील. साऱ्या संतांचं भूषण ठरतील. विश्वास ठेव, माझे आशीर्वाद आहेत हे!’
‘उद्याच इथून निघायचं नि आळंदीला जायचं. तिथे तुझी पत्नी तुझी वाट पहात आहे. देवाला आळवीत आहे. तिला समाधान दे. सुख दे. मनातले नसते विचार सोडून दे.
‘तुझी पत्नी आळंदीला आहे. रोज सोन्याच्या पिंपळाला प्रदक्षिणा घालत आहे. तिला सोन्याचे दिवस दिसणार आहेत.