Sant Dnyaneshwar Information In Marathi

Sant Dnyaneshwar Information

sant dnyaneshwar photo

सोन्याचा दिवस !

गुरुजींचा निरोप घेऊन विठ्ठलपंत घरी आले. सर्वांना भेटले. रुक्मिणीबाईंना खूप आनंद झाला. सोन्याच्या पिंपळाला प्रदक्षिणा घातल्याचं सार्थक झालं होतं.

काही लोक उघडपणे विठ्ठलरावांना टोचून बोलू लागले. ‘हा संन्यासी भ्रष्ट आहे. धर्मबुडव्या आहे. पुन्हा संसार करायला आला आहे. हा अधर्म आहे. याची संगत कुणीही धरू नका, तो पापी आहे. त्याला सर्वांनी दूर ठेवायला हवं!’

या विरोधात आळंदीचा विसोवा प्रमुख होता. सर्वांना तो हेच सांगत सुटे. विसोबा स्वभावानं मूळचाच दुष्ट होता.

विठ्ठलपंतांना लोकांची टवाळी कळत होती. त्यांनी केलेली निंदानालस्ती ते निमूटपणे ऐकत होते. कुणाशीही जास्त बोलत नसत. गावात भिक्षा मागून ते रहात होते. त्या बिकट परिस्थितीत त्यांना धीर देणारे तेथील रहिवासी विद्याधरपंत व त्यांचे निकटचे एक-दोन स्नेही! ते मात्र त्यांना कधीच दुखवीत नसत.

गावातील लोकांचा सतत त्रास होत असे. विठ्ठलपंतांनी गावाबाहेर एक झोपडी बांधून घेतली. त्या झोपडीत ते व त्यांची बायको राहू लागली. खाण्यापिण्याची सोय काहीच नव्हती. गावातील लोकांना विसोबांनी दम दिला होता. या संन्याशाला कुणीच काही देऊ नका. त्याच्यावर बहिष्कार टाका. त्याची

सावलीसुद्धा घेऊ नका.’

विसोबांच्या या धमकावणीला विद्याधरपंत भीक घालीत नसत. ते सवडीनं विठ्ठलपंतांना भेटत. त्यांची अडचण ऐकत. ती दूर करण्याचा प्रयत्न करीत. 

गावातून भिक्षा मिळणं बंद झालं. विठ्ठलपंत सकाळी लवकर उठत. स्नानसंध्या, देवपूजा करीत. नंतर नियमितपणे सिद्धेश्वरांचं दर्शन घेत. जवळच्या गावी जात. तिथे भिक्षा मागून परत येत.

रुक्मिणीबाई दुपारच्या जेवणाची तयारी करी. दोघंही जे असेल ते खात व त्यातच समाधान मानीत. दुपारी थोडा वेळ विश्रांती घेऊन विठ्ठलपंत वाचनात रंगून जात. त्याची पत्नी हे सारं ऐकत बसे. संध्याकाळी झोपडीबाहेर बसावं व दूरवर पहात रहावं, यात सारा दिवस संपत असे.

देवाची कृपा

विठ्ठलपंत व रुक्मिणीबाई हे दोघंही देवभक्त होते. पूर्वीपासून त्यांची विठ्ठलभक्ती चालू होती. आता रोज सिद्धेश्वराचंही दर्शन होत होतं. झोपडीतलं वातावरण शांत होतं.

गावातील विसोबांसारखे दुष्ट व इतर टवाळखोर लोक त्यांना खूप त्रास देत होते. विठ्ठलपंत मुकाट्यानं सारं सहन करीत होते. देवाची कृपा त्यांना लाभली होती. तो त्यांना अंतर देत नव्हता.

थोड्याच दिवसांत त्यांना मुलगा झाला. घरात आनंदी आनंद झाला. घरी गरिबी जरूर होती, पण त्यांची मनं श्रीमंत होती. असेल त्या स्थितीत ती आनंदानं रहात होती.

दिवस येत होते, जात होते. मुलगा मोठा होत होता. त्याचं नांव त्यांनी निवृत्ती ठेवलं. घरात तो कधीच हट्ट करीत नसे. नेहमीच आनंदी दिसे. निवृत्तीनाथ दोन वर्षांचा झाला, आणि त्याच्यानंतर ज्ञानदेवांचा जन्म झाला. ज्ञानदेव म्हणजे ज्ञानाचा सागर. सर्वांना चकित करणारे ते! त्यांची थोरवी कुणालाच सांगता येणार नाही. ज्ञानदेवानंतर थोड्याच दिवसांनी सोपान जन्मला. हळूहळू मोठा होऊ लागला. दोन भावंडांत रमू लागला. घरात आनंद अधिक वाढला होता.

घरात आता तीन तारे चमकत होते. दोन वर्षांनी आणखी एक चांदणी आली, त्यांच्या सोबतीला! त्यांची बहीण – तिचं नावं होतं मुक्ता!

घरात दोन माणसं होती. तिथे आता सहा माणसं झाली. दोन मोठी व चार लहान! पण ती फार गुणी होती. कधी त्रास दिला नाही, कधी कटकटी नाही, का कधी हट्टही केला नाही.

घरची परिस्थिती अडचणीची होती. पण विठ्ठलपंत मनाचे खंबीर होते. ते भिक्षा मागून आणीत व रुक्मिणीबाई सर्वांची व्यवस्था करी. जे असेल ते सर्वांना वाढी. सर्वांना समाधान वाटे.

मुलं गावात जात असत. पण त्यांच्याकडे पहाणारे टवाळ लोक त्यांची चेष्टाच करीत! ‘आलीऽआऽऽली ती पहा, संन्याशाची पोरं. बाप गेला घर सोडून आणि आला पुन्हा परत! कुणी बोलू नका त्या मुलांशी’.

ती मुलं विद्याधरपंतांच्या घराशी आली की त्यांचा आवाज त्यांना ऐकू जाई. ते झटकन बाहेर येत व त्या मुलांना थांबवीत. पत्नीलाही मुलं आल्याचं सांगत. तीही बाहेर येई. ती तेजस्वी मुलं पाहून तिला बरं वाटे. त्या मुलांच्या हातावर काहीतरी गोडधोड ठेवी. मुलं खूष होत आणि तिलाही समाधान वाटे. ही मुलं घरी आल्यावर सारा प्रकार आपल्या आईवडिलांना सांगत. 

Munj Ceremony। मुंजीचा विचार

मुलं मोठी झाली होती. आता त्यांच्या मुंजी कराव्यात, त्यांना वेदाचा अभ्यास शिकवावा असा विठ्ठलपंतांचा विचार चालू होता.

विठ्ठलपंत आळंदीच्या विद्वान ब्राह्मणांना भेटले. त्यांना त्यांनी आपला विचार सांगितला. ब्राह्मणांनी सांगितलं, ‘संन्याशाच्या मुलांना मुंज करता येणार नाही. तसा अधिकारच नाही.’

विठ्ठलपंतांना फार वाईट वाटले. तूर्त आळंदी सोडावी, तीर्थयात्रा कराव्यात, असं त्यांच्या मनात आलं. आपला बेत त्यांनी रुक्मिणीला सांगितला. तिलाही तो पटला.

सर्वांनी सिद्धेश्वराचं दर्शन घेतलं. नमस्कार केला. आळंदी सोडून प्रवास सुरू झाला. सारा प्रवास चालत जाऊन करायचा होता. लहान मुलं कंटाळत नसत.

वाटेत एकदा खूप पाऊस लागला. त्र्यंबकेश्वरा- जवळच्या डोंगरात एक गुहा दिसली. सारी तिथे थांबली. निवृत्तीनाथ सरळ गुहेत गेला. तिथे एक साधू तप करीत होता. त्याने त्यांना वंदन केले. साधूने त्याच्या डोक्यावर हात ठेवला. क्षण-दोन क्षण डोकं सळसळलं. त्याला नवं ज्ञान प्राप्त झालं.

त्या साधूचं नावं होतं गहिनीनाथ ! ते म्हणाले, ‘मी तुला जसं ज्ञान दिलं, तसं तू ज्ञानेश्वराला दे. तो आपल्या अमृतवाणीने ते जगाला देईल. तो मोठा संत होईल.’

सर्व मंडळी त्र्यंबकेश्वरला एक-दोन दिवस राहून नंतर ती पैठणला आली.

विठ्ठलपंत तेथील विद्वानांना भेटले. आपला विचार सांगितला. पण त्यांनीही विठ्ठलपंतांची निराशा केली. ‘संन्याशाच्या मुलांना मुंजीचा अधिकार नाही’, असंच त्यांनीही सांगितलं.

विठ्ठलपंत हात जोडून दीनवाणेपणानं म्हणाले, ‘मुलांचा काय अपराध? ती लहानच आहेत ना? हवं तर मला प्रायश्चित्त सांगा, ते मी आनंदानं घेईन. एखादा दयेचा मार्ग दाखवला तर उपकारच होतील.’

त्यावर कर्मठ ब्राह्मण उद्‌गारले, ‘अशा पापाला दया नाही, त्यास एकच प्रायश्चित्त शास्त्रात सांगितलं आहे.’

आपण प्रायश्चित्त घेऊन आपल्या मुलांच्या मुंजी होणार असतील तर बरं झालं, असा विचार करून त्यांनी विचारलं, ‘कोणतं गुरू महाराज? सांगा ना ? मी ते प्रायश्चित्त घेईन.’

गंभीर अन् कठोर चेहरा करीत मुख्य पुरोहित म्हणाले, ‘देहान्त प्रायश्चित्त! देहाचा अंत करणं, मरून जाणं! तुम्ही एकटयानंच नव्हे तर तुमच्या बायकोनंही!’ पैठणला जाऊनही त्यांना हवं ते समाधान मिळालं नव्हतं.

कठोर निर्णय । Tough Decision

ब्राह्मणांनी सांगितलेला निर्णय विठ्ठलपंतांनी ऐकला. ते घरी आले. खिन्न मनाने बसून राहिले. बायकोनं खोदून खोदून विचारल्यावर त्यांनी सारं काही सांगितलं. ती तर घाबरूनच गेली. विठ्ठलपंत अस्वस्थ होते. सारखा विचार करत होते. काय करावं तेच समजत नव्हतं.

शेवटी त्यांचा निश्चय ठरला. फारच कठोर होता तो!

आपण व आपली बायको दोघांनी हे जग सोडून जायचं देहान्त प्रायश्चित्त घ्यायचं. कोवळ्या मुलांना मागे ठेवून जावं लागणार होतं, पण त्याला. दुसरा उपाय नव्हता.

रात्र झाली. मुलं शांत झोपली होती. पंतांनी पत्नीला उठवलं. आपला निश्चय तिला सांगितला. तिलाही तो पटला. न पटून उपयोगच नव्हता.

तिनं मुलांच्या मस्तकावरून प्रेमाचा हात फिरविला. दोघेही बाहेर पडली. जड पावलांनी प्रयागला गंगाकाठी गेली. देवाचे स्मरण केले आणि त्या दोघांनी गंगेत आपले जीव अर्पण केले. सारं संपलं होतं.

सकाळ झाली. मुलं उठली. पण त्यांना आई-वडील दिसले नाहीत. निवृत्तीनं डोळे मिटले. ध्यान केलं. त्याला सर्व कळलं होतं. त्याने ज्ञानेश्वर, सोपान व मुक्ता यांना खरा प्रकार सांगितला. मुक्ता ढसाढसा रडू लागली. ज्ञानानं तिला पुढ्यात घेतलं. तिची पाठ थोपटली. तिला समजुतीनं सारं सांगितलं. सोपानाची समजूत निवृत्तीनाथ घालत होते.

पैठणच्या विद्वान पंडितांना ही बातमी कळली. एक-दोन पंडित त्या मुलांना भेटूनही गेले. पण काय बोलावं, काय सांगावं, हे त्यांनाही सुचत नव्हतं.

चारही मुलं काही दिवस तिथे राहिली. निवृत्ती मधुकरी मागून आणी. भर दुपारी तो बाहेर पडे व ठराविक वेळीच घरी जाई. घरोघरी मिळालेली मधुकरी घरी येऊन तिघांना खाऊ घाली. मगच उरलेलं अन्न तो जेवत असे.

एकेक दिवस संपत होता. निवृत्ती भावांना गोष्टी सांगे श्रीकृष्णाच्या गोष्टी ऐकताना मुक्ताला खूप गंमत वाटे. आणि मागच्या कटू आठवणींचा विसर पडे.