Dnyaneshwar Maharaj
Sant Dnyaneshwar। ज्ञानेश्वर महाराजांनी केलेले दोन चमत्कार
कुठल्याही गावात पाहिलं, तर तिथे चांगली माणसं असतात तशीच टवाळ माणसंही दिसतात. त्या लहान मुलांना पाहून काहींना दया येई, तर काही लोक टवाळी करीत, चेष्टा करीत.
ज्ञानदेव हे ज्ञानी होते. थोर मनाचे होते. हे ‘विश्वची माझे घर’ असंच ते मानीत असत. माणसाचा देह निराळा असला तरी आत्मा एकच आहे, असं त्यांचं मत होतं अन् त्याप्रमाणेच त्यांची शिकवणही होती.
एका खवचट व टवाळ माणसानं विचारलं, ‘आत्मा एकच असतो, असे तुम्ही सांगता, मग एकाच्या पाठीवर चाबकाचे फटकारे मारले, तर त्याचे वळ तुमच्या पाठीवर दिसतील का?
‘हो-हो! का नाही. निश्चित दिसतील. पहायचंय् का?” ज्ञानदेवांनी विनम्रपणे विचारले. इतक्यात समोरून एक पाणक्या जात होता. पखाली पाण्याने भरून त्या रेड्यावर लादून तो नेत होता. त्या पाणक्याला या टवाळ माणसानं बोलावलं. त्याला सांगितलं, ‘तुझ्या हातातील चाबकानं या रेड्याला चार-पाच जोरदार फटके मार.’
त्याने – पाणक्याने खरंचच आपल्या त्या रेड्याच्या पाठीवर जोरात फटके मारले. पण त्याच्या पाठीवर एकही वळ उठला नव्हता.
मग ज्ञानेश्वर म्हणाले, ‘आता माझी पाठ पहा.’
त्यानं पाहिलं, तर ज्ञानदेवांच्या पाठीवर वळ दिसत होते. टवाळ माणूस गप्प बसला. त्याची चूक त्याला कळली होती.
इतक्यात दुसऱ्या एका टवाळाला लहर आली. तो म्हणाला,
‘देवा, आत्मा एक म्हणता ना? मग आपण बोलतो, तसं जनावरांना बोलता येईल का?’
त्याच्या या प्रश्नावर हसून ज्ञानेश्वर म्हणाले, ‘काय हरकत आहे? बघायचा अनुभव घेऊन? इतक्यात समोरून एक माणूस रेडा घेऊन चालत होता.
त्या टवाळखोराने रेड्याच्या मालकाला रेडा घेऊन बोलावलं. तो माणूस जवळ येताच त्याने त्या रेड्याचं नाव विचारलं. रेड्याचा मालक म्हणाला, ‘त्येचं नावं हाय ज्ञान्या!”
ते नाव ऐकताच सारे हसू लागले. पण ज्ञानदेव शांत होते. ते म्हणाले, ‘वा! फारच छान नाव आहे हो!’
त्यावर तो टवाळखोर ज्ञानदेवांना म्हणाला, ‘त्याला बोलतं करून दाखवा पहिलं, मगच आम्ही तुमचं खरं मानू!’ ‘ठीक आहे, जशी आपली इच्छा!’ असे म्हणून ज्ञानदेव रेड्याजवळ गेले. त्याच्या कपाळावर हात ठेवला. निवृत्तीनाथांब स्मरण केलं. नमस्कार केला व ते वेदमंत्र म्हणू लागले. मंत्र म्हणून थांबले व त्या रेड्याला म्हणाले, ‘आता तू म्हणून दाखव ते मंत्र!’
आणि काय…. महद् आश्चर्य! तो रेडा मान खाली वर करीत ते मंत्र एका सुरात म्हणू लागला. सारे लोक चकित झाले. साऱ्यांना ज्ञानदेवांची थोरवी पटली. हा साधा-सुधा माणूस नाही. देवाचा अवतार आहे, ही खात्री पटली.
सर्वांनी ज्ञानदेवांना नमस्कार केला. त्यांची क्षमा मागितली. असा हा ज्ञानाचा महासागर! त्यांच्या ज्ञानाचा अंत कुणालाच लागणार नव्हता.
Punarjanm। Reincarnation। पुनर्जन्म
ज्ञानेश्वर व त्यांची भावंडे नेवासे गावी आली. या गावाजवळून प्रवरा नदी वहाते. नदीजवळ शंकराचं देऊळ आहे. त्या देवळात ही सारी भावंडं रहात होती.
नदीचा परिसर शांत होता. निवृत्तीनाथ ज्ञानदेवांना म्हणाले, ‘हे ठिकाण मला फार रम्य वाटतं. तुला गीता फार आवडते ना? ती संस्कृत भाषेत लिहिलेली आहे. भगवान श्रीकृष्णांनी अर्जुनाला उपदेश केला, तीच गीता ! पण ज्ञाना, बहुजन समाजाला संस्कृत भाषा कळत नाही. तेव्हा मराठी भाषेत तू तिची रचना कर. पुष्कळांना ती वाचता येईल, त्याचा अर्थ समजेल, लोक भक्तिमार्गाला लागतील.’
ज्ञानेश्वरांनी आपल्या वडील बंधूचं – निवृत्तीनाथांचं मानलं. त्यांनी पुन्हा एकदा गीतेचे अध्याय लक्षपूर्वक वाचले. लेखनाच्या दृष्टीनं विचार केला. मनानं पुढचा आराखडा ठरवला. तरीही निरनिराळे नवे विचार त्यांच्या मनात येतच राहिले.
सूर्यास्ताची वेळ होती. नदीवरून एक सुवासिनी देवळात
आली. देवाचं दर्शन घेतलं. समोर ज्ञानदेव दिसले. त्यांनाही तिनं
हात जोडून नमस्कार केला.
ज्ञानदेवांनी आशीर्वाद दिला – ‘पुत्रवती भव!’
सुवासिनीनं ज्ञानदेवांच्या पायी मस्तक टेकलं. तिच्या डोळ्यातून अश्रू ओघळत होते. ज्ञानदेवांचे पाय भिजत होते. त्यांना काहीच कळेना.
त्यांनी त्या बाईला हलकेच उठवलं. तिला धीर देऊन म्हटलं, ‘कसलं दुःख वाटतं तुला? रडतेस का? काय झालं? ते सारं सारं सांग. देव तुझं दुःख दूर करील. तो फार दयाळू आहे.’ ज्ञानदेवांचे ते ममतेचे शब्द ऐकून ती बाई अश्रू ढाळतच म्हणाली, ‘माझे पती मला सोडून गेले. नदीवर त्यांची चिता पेटणार आहे. त्या चितेत मीही सती जाणार आहे. त्यांच्या मागे रहाण्याची माझी इच्छाच नाही. माझं दुर्दैव! दुसरं काय सांगू देवा?’ बाईचे ते बोल ऐकून ज्ञानेश्वर म्हणाले, ‘अस्सं होय! चल,
मला पाहू दे त्यांना!’
ज्ञानदेव तिच्याबरोबर नदीवर गेले. तिथे काही लोक उभे होते. त्यांनीही ज्ञानदेवांना पाहिलं. पण ओळखलं मात्र नाही.
ज्ञानदेव त्या प्रेताशेजारी बसले व मंत्र म्हणता म्हणता समोरच्या मृत माणसाच्या अंगावरून हात फिरवू लागले. सारे लोक तो प्रकार पहात होते.
आणि थोड्याच वेळात त्या मृत माणसानं डोळे उघडले. तो इकडे तिकडे पाहू लागला. सारे लोक चकित झाले. जमलेल्या जनसमुदायातील एकेक मनुष्य पुढे येत होता. त्या बालज्ञानेशाला वंदन करीत होता.
ज्ञानदेव म्हणाले, ‘बाबा, झोप झाली ना पुरेशी? नाव काय तुमचं?’
‘सच्चिदानंद !’ तो माणूस उद्गारला.
ते नाव ऐकून आनंदी स्वरात ज्ञानदेवांनी म्हटले, ‘सत्, चित्त, आनंद! वा! फार छान ! उद्या मला भेटायला याल? जवळच शंकराचं देऊळ आहे, तिथे या. आता घरी जा, अन् सुखानं रहा एवढं बोलून ते देवळाच्या दिशेकडे चालू लागले
आलेली सर्व मंडळी घरोघर निघून गेली. सच्चिदानंद बाबा पत्नीसह आपल्या घरी गेले. बाहेर अंधार पडू लागला होता, पण त्या बाईच्या अंतःकरणात मात्र नवा प्रकाश पसरला होता. घरात आनंद पसरला होता.
दुसऱ्या दिवशी सच्चिदानंद बाबा पत्नीसह मंदिरात आले. | देवदर्शन झालं. देवांना नमस्कार केला. ती दोघं त्या चारी भावंडांसमोर गेली. त्यांनाही नमस्कार केला.
ज्ञानदेव म्हणाले, ‘या सच्चिदानंद बाबा! बसा. तुम्ही आलात, मला आनंद वाटला! माझं काम करणार ना?’
‘हो, हो! अगदी आनंदानं ! आज्ञा कराल ती निश्चित पुरी करीन मी!’ सच्चिदानंद बाबा मोठ्या भाविकतेने म्हणाले.
‘गीतेच्या संस्कृत श्लोकांवर मी रचलेल्या मराठी ओव्या सांगेन, तुम्ही त्या लिहून घ्यायच्या, केव्हा याल? उद्या सकाळी याल?’ ज्ञानदेवांनी विचारले.
‘हो हो! निश्चित येतो मी!’
‘नेवाशाच्या शिवमंदिरात बाबा रोज येत. ज्ञानदेव त्यांना त्यांनी रचलेल्या ओव्या सांगत. बाबा लिहून घेत. निवृत्तीनाथ, सोपान-मुक्ताई ऐकायला बसत. पुढे पुढे लोकही येऊ लागले.
सारं देऊळ भरून जाऊ लागलं.
खूप दिवस ते लेखन चालू होतं. ज्ञानदेव सांगत आणि बाबा लिहून घेत. अठरा अध्याय लिहून झाले, आणि लेखनाचं काम पुरं झालं. याच ग्रंथाचं नाव—– ‘ज्ञानेश्वरी!’
ज्ञानदेवांच्या ज्ञानाची गंगोत्री! अनेक भाविक ती भक्तिभावानं वाचतात. त्यांना फार समाधान वाटतं. तीच ज्ञानेश्वरी होय!
सच्चिदानंद बाबा ज्ञानेश्वरांजवळ रहात होते. त्यांचं इतर लेखनही करीत होते. ज्ञानेश्वरांचा सहवास त्यांना नेहमीच सुखाचा वाटत होता.
कोता विचार
विसोबाला सरळ विचार सुचत नसे. साध्या प्रकारातसुद्धा तो काहीतरी खुसपट काढी. शेजारीही त्यांना हसायचे, पण त्यांचा हेकटपणा काही सुटायचा नाही.
ज्ञानदेव नित्याप्रमाणे गावात भिक्षा मागायला गेले. वाटेतच विसोबांचं घर होतं. त्यांच्या अंगणात गेले. ‘ॐ भवति भिक्षांदेही’ अशी आरोळी त्यांनी ठोकली.
विसोबा रागानंच बाहेर आले. ‘ए संन्याशाच्या पोरा, अंगणात कशाला आलास? माझं अंगण विटाळून टाकलंस ना ? रस्त्यावर उभा राहिला असतास तर…..? आता अंगणात गोमूत्र शिपून ते शुद्ध करू, की तुझी झोळी भरू?’
‘अंगणात पाऊल ठेवलं, तर अंगण विटाळतं, अपवित्र होतं म्हणजे काय? मला कळलं नाही तुम्हाला काय म्हणायचं, मग रस्ताही नाही का विटाळणार?’ ज्ञानेश्वरांनी विचारले.
‘हे.. हे मला नको सांगूस ! चिमुरड्या पोरानं मला अक्कल
नको आहे शिकवायला. समजलं?’ ‘महाराज, मी लहान तर स्वराच! आपणच मला शिकवायचं.
उगाच त्रास कशाला करून घेता? चुकलो मी. क्षमा करा.’
एवढं बोलून ज्ञानेश्वरांनी हात जोडले. समोरच विद्याधरपंतांचं घर होतं. त्यांनी ज्ञानदेवांना घरात बोलावून घेतलं. विसोबांचं पित्त पुन्हा उसळलं.
‘पंत, या मुलांना तुम्हीच फूस देता. बरं नाही हे! तुम्ही विद्वान! तुम्हाला कोण सांगणार? पण हा अधर्म आहे.’
‘तुम्ही काही सांगायला नकोय विसोबा ! धर्म-अधर्म, शास्त्र- अशास्त्र, हे तुमच्याकडून ऐकण्याची इच्छाच नाही माझी ! ‘मानवता’ म्हणजे काय? आहे का माहीत तुम्हाला? या कोवळ्या मुलांच्या पावलांनी तुमचं अंगण विटाळतं. रस्त्यानं अनेक अस्पृश्यही जातात. त्यांनी रस्ता नाही विटाळत? त्या रस्त्यावरून तुम्ही-आम्ही जातो-येतो ना?’
तेवढं ऐकलं मात्र, विसोबा घरात जाऊन बसले, ते पुन्हा बाहेर आलेच नाहीत.
विद्याधरपंतांनी ज्ञानदेवांना थोपटलं. भिक्षाही घातली. त्याला धीर दिला व घरी जायला सांगितलं.
ज्ञानदेव घरी आला. झोपडीत गेला. आतून दार बंद केलं व घोंगडीवर पडून राहिला. झालेला अपमान त्याला सहन झाला नव्हता !
निवृत्ती व भावंडं बाहेर गेली होती. दुपारच्या वेळी ती परत आली, झोपडीशी आली, तर झोपडीचं दार बंद! निवृत्तीनं दार ठोठावलं. सोपान हाका मारीत होता, पण दार उघडलं जात नव्हतं. काय करावं ते त्यांना सुचत नव्हतं. मुक्ताही बावरली होती. थोड्या वेळात ती सावरली.
तिने स्वतः एक अभंग रचला. तो अभंग ती आपल्या गोड सुरात म्हणू लागली-
‘ताटी उघडा ज्ञानेश्वरा ।
समता वर्तावी। अहंता खंडावी ॥
मुक्ताच्या त्या गोड आवाजानं ज्ञानदेवांचं मन गहिवरलं. त्यांनी दार उघडलं. सारा प्रकार निवृत्तीनाथांना सांगितला. नाथ शांत स्वभावाचे होते. ते म्हणाले, ‘ज्ञाना, टाकीचे घाव सोसावे तेव्हाच दगडाचा देव बनतो. ज्ञानदेवा, सोडून दे तुझ्या मनातला तो विचार!’