Sant Dnyaneshwar Information In Marathi

Sant Dnyaneshwar Maharaj

जिवंत समाधी

चांगदेव आळंदीहून परत गेले. जाताना चारही भावंडांचा निरोप घेऊनच ते निघाले. त्यांचा अहंकार पूर्ण नाहीसा झाला होता. ज्ञानदेवांची थोरवी त्यांना पटली होती. त्या बालयोग्याचं ज्ञान महान होतं. निवृत्तीनाथांची शांतता व त्यांचा अधिकार यांचीही खात्री पटली होती. आपल्या हजारो वर्षांच्या तपश्चर्येपेक्षा या लहान मुलांच्या निष्ठेचं त्यांना कौतुक वाटत होतं. ज्ञानदेवांच्या दर्शनानं त्यांना नवं ज्ञानच मिळालं होतं.

चांगदेव निघून गेल्यावर या चारही भावंडांनी पंढरपुरला जायचा बेत ठरविला. सारेजण पंढरपुरची वाटचाल करू लागले. रोज दिवसभर चालावं. अंधार पडल्यावर एखाद्या गावी थांबावं. देवळात मुक्काम करावा. रात्रभर विश्रांती घ्यावी. दुसरा दिवस उजाडला की पुढे जावं, असा त्यांचा नित्यक्रम होता. वाटचाल संपवून सारे पंढरपुरला आले. एका धर्मशाळेत उत्तरले.

सकाळी लवकर उठावं, चंद्रभागेत स्नान करावं, विठ्ठलरखुमाईचं दर्शन घ्यावं, असा त्यांचा क्रम चालू होता. यावेळी पंढरपुरात आणखी काही संतमंडळी जमली होती. सावता माळी, गोरा कुंभार, जनी, नामदेव व इतरही संत होतेच. एकमेकांच्या सहवासात वेळ मजेत जाई. भक्तिमार्गावर चर्चा होई. भजन व कीर्तन होई. सारा दिवस कसा संपे ते कुणालाच कळत नव्हतं. पंढरपुरहून निघून काही तीर्थक्षेत्रांनाही त्या सर्वांनी भेटी दिल्या.

चारी भावंडांनी इतरांचा निरोप घेतला. विठ्ठलरखुमाईला वंदन करून पुन्हा सर्वजण आळंदीला परत आले.

ज्ञानदेवांनी ठरवलं, मला जे करायचं होतं ते करून झालं आहे. यापुढे मी अधिक काही करूं शकेन असं वाटत नाही. आत्ता सर्वांचा निरोप घेऊन जिवंत समाधी घेण्यात मला जास्त समाधान वाटणार आहे.

त्यांनी आपला विचार नाथांना सांगितला, ज्ञानदेवांची निश्चयी वृत्ती नाथांना माहीत होती. त्यांचा जो निश्चय ठरेल तो कुणालाही बदलता येत नसे.

नाथांनी त्यांच्या विचाराला अनुमती दिली. समाधीसाठी सिद्धेश्वराच्या जवळची जागा पाहिली. ती जागा व्यवस्थित बांधून तयार झाली. समाधीचा दिवसही निश्चित ठरला. तो दिवस होता, कार्तिक वद्य त्रयोदशी, शके १२१८, सन १२९६ हा!

समाधी स्थानात दिवे लावले होते, समोर ज्ञानेश्वरी ग्रंथ ठेवला होता. उदबत्त्यांचा सुगंध दरवळत होता. अनेक भाविक तो सोहळा पहायला जमले होते. ज्ञानदेवांनी नाथांना नमस्कार केला. सोपानाला आलिंगन दिलं. मुक्ताला प्रेमानं कुरवाळलं. आणि ते आपल्या समाधीच्या अंतर्गाभ्यात उतरू लागले.

मुक्ताचे डोळे भरून आले होते. सोपानानं तिला जवळ ओढलं. तिची समजूत घातली. तो म्हणाला, ‘ही वेळ रडण्याची नाही, मुक्ताई! ज्ञानूदादाला आपण सर्वांनी हसत हसतच निरोप द्यायचा आहे. डोळे पूस बघू आधी !’ भावाच्या त्या ममताभरल्या शब्दांमुळे मुक्ताईने आपले अश्रू आवरले.

ज्ञानदेव समाधीच्या गाभ्यात उतरून शांतपणे पाटावर बसले. सर्वांना नमस्कार केला. समाधीच्या प्रवेशावर शिळा ठेवून आत उत्तरण्याची वाट बंद केली. ज्ञानदेवांनी श्वास रोधून धरला. त्यांची समाधी लागली.

जमलेले सारे भाविक जड पावलाने घराकडे परतले. निवृत्तीनाथ त त्यांची भावंडेही झोपडीत आली. आता झोपडीत अस्वस्थता जाणवू लागली.

ज्ञानदेवांनी समाधी घेतली, तेव्हा ते फक्त एकवीस वर्षांचे होते! सोळाव्या वर्षी त्यांनी ज्ञानेश्वरी हा ग्रंथ लिहिला, हा बुद्धीचा आणि एकविसाव्या वर्षी जिवंत समाधी घेण्याचा त्यांच्या कोवळ्या मनाचा निग्रह हा अपूर्व असा साक्षात्कारच मानला पाहिजे! 

Pasaydan in Marathi 

sant dnyaneshwar photo

Pasaydan Lyrics

Pasaydan PDF