Eknath Maharaj Haripath Marathi
Eknath Maharaj Haripath । सार्थ श्री एकनाथ हरिपाठ
Eknath Maharaj Haripath Lyrics
– १ –
हरिचिया दासा हरि दाही दिशा । भावे जैसा तैसा हरी एक ॥
हरी मुखी गातां हरपली चिंता । त्या नाही मागुता जन्म घेणे ॥
जन्म घेणे लागे वासनेच्या संगे । तेचि झाली अंगे हरिरूप ॥
हरिरूप झाले जाणीव हरपले । मी तूं पण गेले हरिचे ठायी ॥
हरिरूप ध्यानी हरिरूप मनी । एका जनार्दनी हरि बोला ॥
– २ –
हरि बोला हरि बोला नातरि अबोला । व्यर्थ गलबला करूं नका ॥
नको अभिमान नको नको मान । सोडी मी तूंपण तोचि सुखी ॥
सुखी त्याने व्हावे जगा निववावे । अज्ञानी लावावे सन्मार्गासी ॥
मार्ग जया कळे भक्ति भाव बळे । जगाचिये मेळे न दिसती ॥
दिसती जनी वनी प्रत्यक्ष लोचनी । एका जनार्दनी ओळखिले ॥
– ३ –
ओळखिला हरि धन्य तो संसारी । मोक्ष त्यांचे घरी सिद्धिसहित ॥
सिद्धी लावी पिसे कोण तया पुसे । नेले राजहंसे पाणी काय ॥
काय ते करावे संदेही निर्गुण । ज्ञानाने सगुण ओस केले ॥
केले कर्म झाले ते निवांतचि ठेले । उपजले मेले ऐसे किती ॥
एका जनार्दनी नाही यातायाती । सुखाची विश्रांती हरिसंगे ॥
– ४ –
जे जे दृष्टि दिसे ते ते हरिरूप । पूजा ध्यान जप त्यासी नाही ॥
वैकुंठ कैलासी तीर्थ क्षेत्री देव । तयावीण ठाव रिता कोठे ॥
वैष्णवांचे गुह्य मोक्षाचा एकांत । अनंतासी अंत पाहता नाही ॥
आदी मध्य अंत अवघा हरि एक । एकचि अनेक हरि करी ॥
एकाकार झाले जीव दोन्ही तिन्ही । एका जनार्दनी ऐसे केले ॥
– ५ –
नामाविण मुख सर्पाचे ते बीळ । जिव्हा नव्हे काळ सर्प आहे ॥
वाचा नव्हे लांब जळो तयाचे जिणें । यातना भोगणे यमपूरी ॥
हरिविण कोणी नाही सोडविता । पुत्र बंधु कांता संपत्तीचे ॥
अंतकाळी कोणी नाहि रे संगती । साधूचे संगती हरि जोडे ॥
कोटे कुळे तारी हरि अक्षरे दोन्ही । एका जनार्दनी पाठ केली ॥
– ६ –
धन्य माय व्याली सुकृत्ताचे फळ । ते निर्मळ हरिवीण ॥
वेदातांचे बीज हरि हरि अक्षरे । पवित्र सोपारे हेचि एक ॥
योग याग व्रत नेम दान धर्म । नलगे साधन जपता हरि ॥
साधनांचे सार नाम मुखी गातां । हरि हरि म्हणता कार्यसिद्धी ॥
नित्य मुक्त तोचि एक ब्रह्मज्ञानी । एका जनार्दनी हरि बोला ॥
– ७ –
बहुतां सुकृते नरदेह लाभला । भक्तिवीण गेला अधोगती ॥
पाप भाग्य कैसे न सरेचि कर्म । नकळेचि वर्ग अरे मूढा ॥
अनंत जन्मीचे सुकृत पदरी । त्याचे सुखी हरि पेठा होय ॥
रावरंक हो कां उच नीच याती । भक्तीवीण माती मुखी त्याच्या ॥
एका जनार्दनी हरि हरि म्हणतां । मुक्ति सायुज्यता पाठी लागे ॥
– ८ –
हरिनामामृत सेवी सावकास । मोक्ष त्यांचे भूत दृष्टी पुढे ॥
नित्य नाम घोष जयाचे मंदिरी । तेचि काशीपुरी तीर्थ क्षेत्र ॥
वाराणशी तीर्थक्षेत्रा नाश आहे । अविनाशासी पाहे नाश कैचा ॥
एका तासामाजी कोटि वेळां सृष्टी । होती जाती दृष्टी पाहे तिची ॥
एका जनार्दनी ऐसे किती झाले । हरिनाम सेविले तोचि धन्य ॥
– ९ –
भक्तीविण पशु कशासी वाढला । सटवीने नेला कैसा नाही ॥
काय माय गेली होती भुतापाशी । हरि नये मुखासी अरे मूढा ॥
पातके करितां पुढे आहे पुसता । काय उत्तर देता होशील तू ॥
अनेक यातना यम करवील । कोण सोडवील तेथे तुजला ॥
एका जनार्दनी सांगता हे तोंडे । अहा वाचा रडे बोलताची ॥
– १० –
स्वहिता कारणें संगती साधूची । भावे भक्ति हरिची भेटी तेणे ॥
हरि तेथे संत संत तेथे हरि । ऐसे वेद चारी बोलताती ॥
ब्रह्म डोळसाते वेदार्थ ना कळे । तेथे हे आंधळे व्यर्थ होती ॥
वेदार्थांचा गोवा कन्या अभिलाषे । वेदे नाही ऐसे सांगितले ॥
वेदाची ही बीजाक्षरे हरि दोनी । एका जनार्दनी हरि बोला ॥
– ११ –
सत्पद हे ब्रह्म चित्पद ते माया । आनंदपदी जया म्हणती हरि ॥
सत्पद निर्गुण चित्पद सगुण । सगुणनिर्गुण हरिपायी ॥
तत्सदिति ऐसे पैल वस्तूवरी । गीतेमाजी हरि बोलीयेले ॥
हरिपद प्राप्ती भोळ्या भाविकासी । अभिमानीयेसी नर्कवास ॥
अस्ति भाति प्रिय तैसी पदे तिनी । एका जनार्दनी तेचि झाले ॥
– १२ –
नाकळे ते कळे कळे ते नाकळे । वळे ते ना वळे गुरुविणे ॥
निर्गुणी पावले सगुणी भजता । विकल्प झडता जिव्हा झडे ॥
बहुरूपी धरी संन्याशाचा वेष । पाहोन तयास धन देती ॥
संन्याशाला नाही दिले बहुरूपी याला । सगुणी भजला तेथे पावे ॥
अद्वैताचे खेळ दिसे गुणागुणी । एका जनार्दनी ओळखिले ॥
– १३ –
ओळखिला हरि साठविला पोटी । होता त्याची भेटी दुःख कैचे ॥
नर अथवा नारी हो कां दुराचारी । मुखी गाता हरि पवित्र तो ॥
पवित्र ते कुळ धन्य त्याची माय । हरि मुखे गाय नित्य नेमे ॥
काम क्रोध लोभ जयाचे अंतरी । नाही अधिकारी ऐसा येथे ॥
वैष्णवांचे गुह्य काढिले निवडुनि । एका जनार्दनी हरि बोला ॥
– १४ –
हरि बोला देता हरि बोला घेता । हसता खेळता हरि बोला ॥
हरि बोला गाता हरि बोला खाता । सर्व कार्य करिता हरि बोला ॥
हरि बोला एकांती हरि बोला लोकांती । देहत्यागा अंती हरि बोला ॥
हरि बोला भांडता हरि बोला कांडता । उठता बैसता हरि बोला ॥
हरि बोला जनी हरि बोला विजनी । एका जनार्दनी हरि बोला ॥
– १५ –
एक तीन पाच मेळा पंचविसावा । छत्तीस तत्त्वांचा मूळ हरि ॥
कल्पना अविद्या तेणे झाला जीव । मायोपाधी शिव बोलीजे ती ॥
जीव शिव दोन्ही हरिरूपी तरंग । सिंधु तो अभंग जेणे हरि ॥
शुक्तिवरी रजत पाहता डोळा दिसे । रज्जुवरी भासे मिथ्या सर्प ॥
क्षेत्र क्षेत्रज्ञाते जाण साती ज्ञानी । एका जनार्दनी हरि बोला ॥
– १६ –
कल्पनेपासूनी कल्पिला जो ठेवा । तेणे पडे गोवा नेणे हरि ॥
दिल्या वांचुनि फळप्राप्ती कैची । इच्छा कल्पनेचि व्यर्थ बापा ॥
इच्छावे ते जवळी हरिचे चरण । सर्व नारायण देतो तुज ॥
न सुटे कल्पना अभिमानाची गांठी । घेता जन्म कोटी हरि कैचा ॥
एका जनार्दनी सापडली खूण । कल्पना अभिमान हरि झाला ॥
– १७ –
काय पद्मिनीचे षंढासी सोहाळे । वांझेसी डोहाळे कैसी होती ॥
अंधापुढे दीप खरासी चंदन । सर्पासी दुग्धपान करू नये ॥
क्रोधी अविश्वासी त्यांसी बोध कैचा । व्यर्थ आपुली वाचा शिणनूं नको ॥
खळासी संगति उपयोगासी नये । आपणा अपाय त्याचे संगे ॥
वैष्णवी कुपथ्य टाकिलें वाळूनि । एका जनार्दनी तेचि भले ॥
– १८ –
न जायचि ताठा नित्य खटाटोप । मंडुकी वटवट तैसे ते गा ॥
प्रेमाविना भजन नाकाविण मोती । अर्थाविण पोथी वाचूनि काय ॥
कुंकवा नाही ठाव म्हणे मी आहेव । भावाविण देव कसा पावे ॥
अनुतापावीण भाव कसा राहे । अनुभव पाहे शोधुनिया ॥
पाहता पाहणे गेले ते शोधुनी । एका जनार्दनी अनुभविले ॥
– १९ –
परिमळ गेलिया वोस फुल देठी । आयुष्या शेवटी देह तैसा ॥
घडी घडी काळ वाट पाहे । अजूनि किती आहे अवकाश ॥
हाचि अनुताप घेऊनी साधन । काही तरी बोध करी मना ॥
एक तास उरला खट्वांगरायासी । भाग्यदशा कैची प्राप्त झाली ॥
सापडला हरि तयाला साधनी । एका जनार्दनी हरि बोला ॥
– २० –
करारे बापांनो साधन हरीचे । झणी करणीचे करूं नका ॥
जेणे नये जन्म यमाची यातना । ऐसिया साधन करा काही ॥
साधनाचे सार मंत्रबीज हरी । आत्मतत्त्व धरी तोचि एक ॥
कोटि कोटि यज्ञ नित्य ज्याचा नेम । एक हरिनाम जपता घडे ॥
एका जनार्दनी न घ्यावा संशय । निश्चयेसी होय हरिरूप ॥
– २१ –
बारा जणी हरिसी नेणती । म्हणोनि फिरती रात्रंदिवस ॥
सहस्त्र मुखांचा वर्णिता भागला हर्ष जया झाला तेणे सुखे ॥
वेद जाणूं गेला पुढे मौनावला । ते गुह्य तुजला प्राप्त कैचे ॥
पूर्व सुकृताचा पूर्ण अभ्यासाचा । दास सद्गुरूचा तोचि जाणे ॥
जाणते नेणते हरिचे ठिकाणी एका जनार्दनी हरि बोला ॥
– २२ –
पिंड देह स्थिती ब्रह्मांडी पसारा । हरिवीण सारा व्यर्थ भ्रम ॥
शुक याज्ञावल्क्य दत्त कपिल मुनी । हरिसी जाणून हरिच झाले ॥
यारे यारे धरूं हरिनाम तारूं । भवाचा सागरू भय नाही ॥
साधुसंत गेले आनंदी राहिले । हरिनामे झाले कृतकृत्य ॥
एका जनार्दनी मांडिले दुकान । देतो मोलाविण सर्ववस्तू ॥
– २३ –
आवडीन भावे हरिनाम घेसी । तुझी चिंता त्यासी सर्व आहे ॥
नको खेद करूं कोणत्या गोष्टीचा । पति तो लक्ष्मीचा जाणतसे ॥
सकळ जीवांचा करितो सांभाळ । तुज मोकलील ऐसे नाही ॥
जैसी स्थिती आहे तैशापरी राहे । कौतुक तूं पाहे संचिताचे ॥
एका जनार्दनी भोग प्रारब्धाचा । हरिकृपे त्याचा नाश झाला ॥
– २४ –
दुर्बळाची कन्या समर्थाने केली । अवदसा निघाली दरिद्राची ॥
हरि कृपा होता भक्तां निघती दोंदे । नाचती स्वानंदे हरिरंगी ॥
देव भक्त दोन्ही एकरूप झाले । मुळीचे संचले जैसे तैसे ॥
पाजळली ज्योति कापुराची वाती । ओवाळितां आरती भेद नुरे ॥
एका जनार्दनी कल्पचि मुरला। तोचि हरि झाला ब्रह्मरूप ॥
– २५ –
पांची मुद्रा लावी लावुनिया लक्ष । तो आत्मा प्रत्यक्ष हरि दिसे ॥
कानी जे पेरिले डोळा उगवले । व्यापक भरले तोचि हरि ॥
कर्म उपासना ज्ञानमार्गी झाले । हरिपाठ आले सर्व मार्ग ॥
नित्य प्रेमभावे परिपाठ गाय । हरिकृपा होईल तयावरी ॥
झाला हरिपाठ बोलणे येथूनि एका जनार्दनी हरि बोला ॥
सार्थ श्री एकनाथ हरिपाठ समाप्त