Albert Einstein’s information in marathi

Albert Einstein: विसाव्या शतकाचे महान वैज्ञानिक व सापेक्षतावादाचे (थिअरी ऑफ रिलेटिव्हिटी) प्रवर्तक अल्बर्ट हर्मन आइन्स्टाइन यांचा जन्म 14 मार्च, 1879 रोजी दक्षिण जर्मनीतील उल्म गावात एका मध्यमवर्गीय यहुदी कुटुंबात झाला. त्यांच्या जन्मानंतर वर्षभराच्या आतच त्यांचे कुटुंब म्युनिच शहरात स्थलांतरित झाले. येथे त्यांच्या वडिलांनी एक विद्युत- रासायनिक संयंत्र (इलेक्ट्रो-केमिकल प्लांट), इंजिनीअरिंग वर्क्सची स्थापना केली. त्यावेळी त्यांचे एक काका जेकब यांनी त्यांच्यात गणिताची आवड निर्माण केली; तर दुसरे काका काजर कोच यांनी विज्ञानाबद्दल औत्सुक्य व जिज्ञासा निर्माण केली.

Albert Einstein
Albert Einstein in 1882, age 3

अल्बर्ट यांचे जीवन सर्वसामान्य स्वरूपाचे असले; तरी लहानपणापासूनच ते इतर मुलांपेक्षा वेगळे होते. सामान्य मुलांपेक्षा अधिक काळानंतर त्यांनी बोलण्याची क्रिया सुरूकेली. त्यामुळे त्यांच्या आई-वडिलांना काळजी वाटत होती. ते आपल्या वयाच्या मुलांशी खेळत नसत वा बोलतही नसत. त्याऐवजी ते पहुडलेल्या अवस्थेत दिवास्वप्ने पाहत. शारीरिक श्रम करणे, इतकेच काय, एखादा खेळ खेळणेही त्यांना आवडत नसे. म्युनिचमध्ये त्या दिवसांत लष्कर सातत्याने ध्वज संचलन करत असे. अल्बर्ट यांना हा प्रकार आवडत नसे. प्रत्यक्षात त्यांना कवायत करणाऱ्या शिपायांच्या पायांची यांत्रिक हालचाल तिरस्करणीय वाटे; इतर मुले आणि तरुण यांना मात्र शिपायांच्या यांत्रिक हालचाली पाहण्यात आनंद वाटे आणि त्यापासून प्रेरणाही मिळे.

अल्बर्ट (Albert Einstein) यांना दर्जेदार संगीत ऐकायला आवडत असे. हा गुण त्यांना परंपरेने आपल्या आईकडून मिळाला होता. त्यांची आई बिथोवनची चाहती होती. अल्बर्ट यांनी सहाव्या वर्षी व्हायोलीनवादन शिकून घेतले होते. हा त्यांच्या वडिलांचा आवडता छंद होता. त्यांचा हा छंद आयुष्यभर टिकला. फुरसतीच्या वेळात वा विरंगुळ्याच्या क्षणी व्हायोलीन वाजवणे त्यांना आवडत असे.

त्या काळी म्युनिचमध्ये सार्वजनिक शाळा नव्हती. बहुतांश शाळा निरनिराळ्या संप्रदायांचे लोक चालवत. अल्बर्ट यांचे पालक यहुदी असले, तरी धर्माध नव्हते. त्यामुळे त्यांनी अल्बर्ट यांना घराजवळील एका कॅथलिक शाळेत दाखल केले. 10 वर्षांचे असताना त्यांना जिम्नेजियम सेकंडरी स्कूलमध्ये दाखल केले गेले. तेथे विदयार्थ्यांना विद्यापीठात प्रवेश घेण्यापूर्वीचे शिक्षण दिले जाई. त्याशिवाय काही धार्मिक शिक्षणही दिले जाई. अशा प्रकारे, त्यांनी आपल्या शाळेत यहुदी आणि कॅथलिक दोन्ही धर्माचे ज्ञान मिळवले. दोन्ही धर्मातील वाईट आणि चांगल्या गोष्टींशी ते परिचित झाले होते. या- व्यतिरिक्त त्यांना कोणत्याही धर्माबद्दल ओढ नव्हती. इतकेच नव्हे, तर शारीरिक प्रशिक्षण अनिवार्य असलेल्या आणि पोपटपंची कराव्या लागणाऱ्या शिक्षणप्रणालीचा देखील त्यांना तिरस्कार होता.

अल्बर्ट यांचे काका जेकब त्यांना अभ्यास करण्यासाठी नेहमी प्रोत्साहित करत आणि बीजगणित व भूमितीत त्यांना मदत करत, अल्बर्ट 15 वर्षांचे असताना त्यांच्या वडिलांना व्यापारात आर्थिक संकटास सामोरे जावे लागले. त्यांना आपला विदधुत संयंत्रांचा व्यवसाय बंद करावा लागला व ते म्युनिच येथून इटलीच्या मिलान शहरात गेले. पण अल्बर्ट मात्र जिम्नेजियममधून आपली पदविका पूर्ण करण्यासाठी तेथेच राहिले. गणित त्यांना इतके आवडे की इतर विषयांकडे ते लक्षच देत नसत. ही बाब त्यांच्या परीक्षच्या निकालपत्रकात प्रतिबिंबित झाली. याव्यतिरिक्त शारीरिक प्रशिक्षणाच्या वर्गातही ते रमत नसत आणि त्यांना ते अनावश्यक वाटत असे. शिक्षकांच्या कडक शिस्तीमुळे व जाचामुळे त्यांच्यात शिक्षणपद्धतीबद्दल घृणा निर्माण झाली. शेवटी त्यांना शाळेतून तात्पुरते काढून टाकण्यात आले, तेव्हा ते आपल्या घरी इटलीला परत गेले. 

इटलीला परतल्यावर आइन्स्टाइन(Albert Einstein) यांना आपल्या भविष्याचा विचार करण्यासाठी पुरेसा अवधी मिळाला. त्यांनी गणितीय पदार्थविज्ञानाचा अभ्यास करण्याचा निर्णय घेतला. तसेच त्यांनी स्वित्झर्लंडच्या स्विस फेडरल पॉलिटेक्निक स्कूल, झ्युरिच येथील प्रवेश परीक्षा दिली. पण ते सफल झाले नाहीत. गणितात त्यांना चांगले गुण मिळाले, पण भाषा आणि जीवशास्त्रात ते उत्तीर्ण होऊ शकले नाहीत. मात्र गणितातील त्यांची योग्यता पाहून मुख्याध्यापक खूप प्रभावित झाले व अल्बर्ट यांना शाळेत प्रवेश देण्यासाठी त्यांनी साहाय्य केले.

त्यांना जाणवले की, येथील शिक्षणपद्धती म्युनिचपेक्षा खूप चांगली आहे. शिक्षक नेहमी विदयार्थ्यांना प्रोत्साहित करत. सर्वांत महत्त्वाची गोष्ट म्हणजे येथे त्यांना शारीरिक प्रशिक्षणाच्या वर्गांना जावे लागत नसे. येथे ते आनंदित होते. विविध विषयांवर विचार- विमर्श करणे त्यांना आवडे. ते त्यात नेहमी भाग घेत. आयुष्यात पहिल्यांदाच शाळेत जाण्यासाठी ते उत्सुक झाले. पदार्थविज्ञानाचा शिक्षक बनण्यासाठी त्यांनी प्रशिक्षित होण्याचा विचार केला व त्यानुसार आपल्या विषयांची निवड केली आणि त्यांनी आपले शिक्षण उत्तम तन्हेने पूर्ण केले.

आइन्स्टाइन यांचे वडील व्यापारात अयशस्वी ठरले. त्यामुळे ते आइन्स्टाइनच्या शिक्षणासाठी पैशांची सोय करू शकत नव्हते. स्वाभाविकच आइन्स्टाइन यांना आर्थिक अडचणी सहन कराव्या लागल्या. सुदैवाने त्यांच्या एका सधन नातेवाईकाने त्यांचा शिक्षणाचा व भोजनाचा खर्च उचलला. त्यामुळे अंतिमतः ते विदयापीठाचे शिक्षण पूर्ण करण्यात यशस्वी झाले.

आइन्स्टाइन एक प्रतिभावान विदयार्थी होते. शिक्षक व प्राध्यापकांचे त्यांच्याबद्दल चांगले मत झाले आणि त्यांच्याकडून आइन्स्टाइन यांना प्रशस्तीही मिळाली. पण शिक्षकाची नोकरी मिळवण्यात ते असफल ठरले. त्यामुळे ते बरेचसे निराशही झाले. जगण्यासाठी उत्पनाचे साधन असणे आवश्यक आहे, हे त्यांना जाणवू लागले. त्यांनी बर्न येथे स्विस पेटंट कार्यालयात काम करण्यास प्रारंभ केला. फावल्या वेळात स्वशिक्षण आणि संशोधन करून त्यांनी गणितीय पदार्थविज्ञानाचा अभ्यास चालू ठेवला.

यादरम्यान जर्मनीमध्ये हिटलर व नाझीवाद प्रबळ झाले होते. त्यांनी यहुदी लोकांचे जगणे कठीण केले होते. मोठ्या संख्येने यहुदी लोकांची सामूहिक हत्या करण्यात आलो व त्यांच्या दैनंदिन जीवनात अडथळा आणण्यात आला. नाझी लोकांनी उभारलेल्या कोडवाड्यांच्या आसपासच्या ठिकाणच्या यहुदयांचे वास्तव्य असुरक्षित बनले.

Albert Einstein
Albert Einstein

बर्न येथील पेटंट कार्यालयातील कार्यकाळात इ. स. 1905 मध्ये त्यांनी जगप्रसिदध ‘सापेक्षतावादाचा सिद्धांत’ (थिअरी ऑफ रिलेटिव्हिटी) सादर केला. या सिद्धांतामुळे पुढे न्यूक्लिअर (परमाणू) बाँब बनवणे सोपे झाले. त्यावेळी वैज्ञानिक जगतासमोर सर आयझक न्यूटन व त्यांचे गतिविषयक नियम होते. त्यांचा व्यापक रूपात स्वीकार करण्यात आला होता. न्यूटन यांनी आपले सिद्धांत सुमारे अडीच शतकांपूर्वी सादर केले व पदार्थ- विज्ञानातील अनेक प्रश्नांना समाधानकारक उत्तरे दिली होती.

आइन्स्टाइन यांच्या सापेक्षतावादाच्या सिद्धांताने पदार्थविज्ञानात क्रांती केली. पदार्थविज्ञानाच्या प्राचीन नियमानुसार पदार्थाची (मॅटर) निर्मितीही करता येत नाही व तो नष्टही करता येत नाही, हे स्वीकृत सत्य होते. आइन्स्टाइन यांनी शोध लावला की, पदार्थाचे ऊर्जेत व ऊर्जेचे पदार्थात रूपांतर केले जाऊ शकते. आइन्स्टाइन यांचा निष्कर्ष एका समीकरणाच्या रूपात, संक्षिप्तपणे असा मांडण्यात येतो : E = mc² यात ई (E) = एनर्जी (ऊर्जा), एम (m) = पदार्थाचे वस्तुमान व सी (c) = प्रकाशाचा वेग, जेथे सी (c) = 3 × 108 निर्वात अवस्थेत एम / एस हे पदार्थविज्ञानातील सर्वांत प्रसिद्ध समीकरण आहे. या समीकरणाने हे स्पष्ट केले की, पदार्थ वा द्रव्याच्या थोड्या प्रमाणावर विशिष्ट तन्हेने प्रक्रिया केली गेली, तर प्रचंड ऊर्जा उत्पन्न करता येते.

आइन्स्टाइनचे समकालीन जर्मन वैज्ञानिक मॅक्स प्लैक यांनी 100 वर्षांपूर्वी, इ. स. 1900मध्ये प्रकाशाचा सिद्धांत ‘पुंज सिद्धांत’ (क्वांटम थिअरी) या रूपात सादर केला होता. पण लोक जुने सिद्धांत मोडीत काढण्यास तयार नव्हते. वैज्ञानिकांनी प्लॅक यांचा सिद्धांत तात्काळ स्वीकारला नाही. आइन्स्टाइन यांनी प्लैक यांच्या ‘पुंज सिद्धांता ‘चा उपयोग ‘प्रकाश-विदयुत प्रभाव’ (फोटो-इलेक्ट्रिक इफेक्ट) स्पष्ट करण्यासाठी केला. पुंज सिद्धांताबरोबरच वैज्ञानिकांचे लक्ष त्यांच्या सापेक्षता सिद्धांताकडेही (थिअरी ऑफ रिलेटिव्हिटी) त्यांनी वेधले.

त्यावेळी आपल्या देशाचे राष्ट्रीय स्तरावरील नेते स्वर्गीय श्यामाप्रसाद मुखर्जी यांचे वडील सर आशुतोष मुखर्जी कलकत्ता विद्यापीठाचे कुलपती होते. तसेच ते उच्च न्यायालयाचे सेवानिवृत्त न्यायाधीश होते. पण गणित हा त्यांच्या आवडीचा विषय होता. विद्यापीठाचा विज्ञान विभाग विकसित करण्यात त्यांनी मोठे योगदान दिले होते. महान भारतीय वैज्ञानिक सत्येंद्रनाथ बोस हे त्यांचे विदयार्थी होते. बोस हे विद्यापीठाच्या एम. एससी.च्या परीक्षेत प्रथम आले; तेव्हा त्याच महाविद्यालयात व्याख्यातापदावरील नियुक्तीचा प्रस्ताव त्यांच्यासमोर ठेवण्यात आला. सापेक्षतावादाचा सिद्धांत जाहीर केला गेला, तेव्हा मुखर्जी यांनी विदयापीठात स्नातकोत्तर अभ्यासक्रमात एक विषय म्हणून तो समाविष्ट केला आणि बोस यांना त्याचा अभ्यास करून तो शिकवण्यासाठी प्रोत्साहित केले. पुढे आइन्स्टाइन यांच्या पूर्वपरवानगीने त्यांच्या सापेक्षतावादाच्या संबंधातील शोध- निबंधांचे बोस यांनी जर्मनीतून इंग्रजीत भाषांतर केले व विदयापीठाद्वारा ते प्रकाशित केले. 

आइन्स्टाइन यांनी योग्य व यथार्थ भाषांतरासाठी बोस यांचे अभिनंदन केले. इ. स. 1924मध्ये बोस पुढील संशोधन करण्यासाठी युरोप दौऱ्यावर गेले होते, तेव्हा ते आइन्स्टाइन यांना व्यक्तिशः भेटले व शोधनिबंधांचे भाषांतर करण्यासाठी परवानगी दिली, याबद्दल आभार मानले. आइन्स्टाइन यांनीही बोस यांच्याकडून केल्या गेलेल्या सापेक्षता सिद्धांताच्या उत्तम भाषांतरासाठी समाधान व्यक्त केले. इ. स. 1915मध्ये आइन्स्टाइन यांनी सापेक्षतावादाचा सिद्धांत सादर केला. या सिद्धांतानुसार, महाकाय तायऱ्यांजवळून जाताना प्रकाशकिरण खालच्या बाजूस वक्र होऊन वळावयास हवेत, हे सत्य इ. स. 1919मध्ये पूर्ण सूर्यग्रहणाच्या दरम्यान एडिंग्टन यांनी पडताळून दाखवले.

आइन्स्टाइन यांचा सापेक्षतावादाचा सिद्धांत जाहीर झाल्यावर व त्यावर शोध- निबंध प्रकाशित होऊ लागल्यावर जगातील वैज्ञानिकांनी त्याचा पूर्ण अभ्यास केला आणि स्वीकार करून त्यावर स्वीकृतीची मोहोर उमटवली. अशा प्रकारे जगाने आता त्यांना मान्यता दिली व त्यांची प्रतिभा स्वीकारली. इ. स. 1909 साली झ्युरिच विदयापीठात त्यांना साहाय्यक प्राध्यापक म्हणून नियुक्त केले गेले. यानंतर प्रागमध्ये जर्मन विदयापीठात त्यांनी कार्यभार सांभाळला. तेथे काही काळ सेवारत राहून इ. स. 1912 साली ते प्राध्यापक म्हणून इयुरिच विद्यापीठात परत आले. बर्लिन विदयापीठात त्यांना आमंत्रित केले गेले आणि विविध संस्थांच्या निमंत्रणांवरून त्यांनी इंग्लंड-अमेरिकेचाही दौरा केला. याचदरम्यान जर्मनीत नाझींची सत्ता आली आणि लवकरच त्यांनी आइन्स्टाइन यांचे घर व संपत्ती जप्त केली.

आइन्स्टाइन यांनी अमेरिकेच्या न्यू जर्सीमधील प्रिंसेंटन येथे गणिताच्या अध्यापनासाठी नव्याने स्थापन झालेल्या एका संस्थेचे संचालकपद स्वीकारले. त्यांनी अमेरिकेचे नागरिकत्वही स्वीकारले. यहुदी लोकांबाबत नाझींनी अवलंबिलेले क्रौर्य, रानटीपणा व अत्याचारांमुळे ते अस्वस्थ झाले. यहुदी लोकांसाठी स्वतंत्र राष्ट्र असावे या आंदोलनाचे त्यांनी अमेरिकेत जाहीर समर्थन केले. वास्तविक ते वैश्विक सरकारचे खरे समर्थक होते.

आइन्स्टाइन यांनी इ. स. 1939च्या सुरुवातीस तत्कालीन अमेरिकन राष्ट्राध्यक्ष फ्रैंकलिन रूझवेल्ट यांना लिहिलेल्या एका व्यक्तिगत पत्रात सूचित केले होते, “जर्मन वैज्ञानिक लवकरच युरेनिअमची ऊर्जा एका मोठ्या स्रोतात बदलण्यात समर्थ होतील; ज्यात जग नष्ट करण्याची क्षमता असेल. या प्रकारचा एक बाँब एखादे मोठे शहर वा बंदर नष्ट करण्यास पुरेसा होईल.” त्यांनी अमेरिकन राष्ट्राध्यक्षांना विनंती केली की, जर्मन बाँबचा प्रतिकार व सामना करण्यासाठी एका परियोजनेचा त्यांनी स्वीकार करावा. त्यांच्या भाकितानुसार बरोबर 6 वर्षांनी 6 ऑगस्ट 1945 रोजी अमेरिकेने जपानच्या हिरोशिमा शहरावर एक अणुबाँब टाकला. त्या बाँबमुळे सुमारे 60,000 लोक मारले गेले आणि जवळजवळ 1,00,000 लोक घायाळ झाले. शिवाय जवळजवळ 6000 घरे जमीनदोस्त झाली आणि 2,00,000 लोक बेघर झाले. त्याच प्रकारचा आणखी एक बाँब तीन दिवसांनी नागासाकी शहरावर टाकण्यात आला. परिणामी, जपानने लगेच शरणागती पत्करली व दुसरे महायुद्ध समाप्त झाले.

दुसऱ्या महायुद्धाच्या शेवटी इस्रायल नावाचे स्वतंत्र राष्ट्र निर्माण केले गेले व आइन्स्टाइन यांना राष्ट्राचे अध्यक्ष बनण्यासाठी आमंत्रित केले गेले. या प्रस्तावाला त्यांनी नम्रतापूर्वक नकार दिला व सांगितले की, आपण केवळ विज्ञानाशी संबंधित प्रश्नांचे समाधान करण्यात मदत करू शकतो. मानवजात व सामान्यतः सर्व मानवतेशी संबंधित समस्यांचे समाधान करण्यास आपण समर्थ नाही.

आइन्स्टाइन यांना त्यांच्या प्रकाश-विद्युत प्रभाव (फोटो-इलेक्ट्रिक इफेक्ट) या विषयावरील संशोधनासाठी इ. स. 1921 मध्ये पदार्थविज्ञानासंबंधी ‘नोबेल पारितोषिक’ प्रदान करण्यात आले. सापेक्षतावादाचा सिद्धांत सादर करणे व विश्व-उत्पत्तिशास्त्रावर (कॉस्मॉलॉजीवर) शोधनिबंध प्रकाशित करणे, याशिवाय त्यांनी गुरुत्वाकर्षण (ग्रॅव्हिटी) व विद्युत-चुंबकत्व (इलेक्ट्रो-मॅग्नेटिझम) यांचे एकत्रीकरण करणारा एकीकृत सिद्धांत विकसित करण्यात कित्येक वर्षे व्यतीत केली. परंतु यात ते यशस्वी झाले नाहीत. कोणीही यात सफलता मिळवली नाही.

अणुबाँबसारख्या सार्वत्रिक विनाश करू शकणाऱ्या घातक हत्यारांच्या बाबतीत आइन्स्टाइन हे कडवे विरोधक होते. जपानमध्ये अणुबाँबद्वारे केल्या गेलेल्या विनाशाबद्दल त्यांना समजले, तेव्हा ते भयकंपित झाले व यासाठी स्वतः दोषी असल्याची भावना त्यांच्या मनात निर्माण झाली. या विनाशाला तेही जबाबदार होते. त्यांनी विचार केला होता की, त्यांच्या शोधाचा उपयोग मानवतेच्या हितासाठी होईल. इतकेच नाही, तर त्यांनी या संदर्भात अहिंसेचे समर्थक अससेल्या गांधीजींशीही पत्रव्यवहार केला होता.

शांततेचा संदेश देणाऱ्या या महान वैज्ञानिकाने 18 एप्रिल, 1955 रोजी प्रिंस्टनमध्ये जगाचा निरोप घेतला. आपल्या अखेरच्या श्वासापर्यंत ते अणु-ऊर्जेच्या दुरुपयोगामुळे दुःखी व खिन्न होते.